इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2024) ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक लीग आहे... त्यामुळे जगभरातील क्रिकेटपटू या लीगमध्ये आपली छाप पाडून कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी प्रयत्नशील असताना दिसतात.. या लीगमुळे भारतालाही अनेक युवा सुपरस्टार मिळाले आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत. आयपीएलमुळे फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, ब्रेंडन मॅक्युलम, केन विलियम्सन, ग्लेन मॅक्सवेल यांना भारतीयांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि ते आता भारताला त्याचं दुसरं घरच समजतात. अशात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने जोपर्यंत पायात त्राण आहेत तोपर्यंत आयपीएलमध्ये खेळणार असे विधान केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले. अफगाणिस्तानविरुद्ध मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाच्या संघाला ७ बाद ९१ धावांच्या बिकट अवस्थेतून बाहेर काढले. २९२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते, परंतु मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावून विजय खेचून आणला. त्यानंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये मॅक्सवेलने विजयी धाव घेत ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने विजय पक्का केला. भारताविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मॅक्सवेनने नाबाद शतक झळकावून ऑसींना विजय मिळवून दिला होता.
मॅक्सवेल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो आणि यापूर्वी तो पंजाब किंग्सकडून खेळला होता. २०२१ च्या पर्वात RCB कडून मॅक्सवेलने १४४च्या स्ट्राईक रेटने ५१३ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर पुढील पर्वात १४ सामन्यांत ४०० धावा केल्या होत्या. आता मॅक्सवेल बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळतोय. यावेळी त्याने जोपर्यंत पायात त्राण आहे, तोपर्यंत आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत आयपीएल माझ्यासाठी किती चांगले आहे याबद्दल मी बोलत होतो; मी ज्या लोकांना भेटलो, मी ज्या प्रशिक्षकांच्या हाताखाली खेळलो, ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत मला खांद्याला खांदा लावून खेळायची संधी मिळाली, या सर्वांचा माझ्या संपूर्ण कारकिर्दीसाठी फायदाच झाला.
“तुम्ही एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यासोबत दोन महिने खांद्याला खांदे लावून खेळता. इतरांचा खेळ पाहताना त्यांच्याशी चर्चा करता. एखाद्या खेळाडूसाठी हवा असलेला हा शिकण्याचा अनुभव इथे मिळतो. आशा करतो की ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी जास्तीत जास्त ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळावी, कारण इथली परिस्थिती आणि वेस्ट इंडिजमधील परिस्थिती यात फार फरक नाही. याचा आम्हाला फायदाच होईल,''असे मॅक्सवेल म्हणाला.
२०२४ हंगामापूर्वी आरसीबीने मॅक्सवेलला संघात कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाचा वन डे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यासह अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी नावे नोंदवली आहेत.