कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना कॅनबेरा येथे सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 5 बाद 534 धावांवर घोषित केल्यानंतर मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेचे तीन फलंदाज दुसऱ्या दिवसअखेर 123 धावांवर माघारी परतले आहेत. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ कुलरत्नेला मानेला चेंडू आदळल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सामन्यात काही काळ तणावजन्य परिस्थिती ओढावली होती. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा 21 वर्षीय व्हिल पुकोवस्कीला संघातून वगळल्यामुळे ही मालिका चर्चेत आली आहे. पुकोवस्कीला ज्या कारणानं माघारी पाठवण्यात आलं ते ऐकून कुणीही हैराण होतील.
आठ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव पाठीशी असणाऱ्या पुकोवस्कीला संघात स्थान दिले तेव्हा तो चर्चेत राहिला होता आणि आता माघारी पाठवल्यानंतरही त्याचीच चर्चा आहे. मानसिक स्वास्थ्य नीट नसल्यामुळे त्याला माघारी पाठवण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी सांगितले. त्याने व्हिक्टोरिया संघाकडून वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध 243 धावांची वादळी खेळी केली होती आणि त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळाले होते. मात्र, या खेळीनंतर त्याने मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी विश्रांती घेतली होती. त्याला पुन्हा या समस्येने गाठले आहे आणि म्हणून त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघारी पाठवण्यात आले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख रिचर्ड शॉ म्हणाले की,''व्हिल पुकोवस्कीला संघातून रिलीज करण्यात आले आहे. तो उपचार करण्यासाठी मेलबर्नला जाणार आहे. त्याने मागील काही दिवसांत आम्हाला या आजाराची कल्पना दिली होती. त्यामुळे त्याच्या भविष्याचा विचार करता त्याला घरी पाठवणं आम्हाला योग्य वाटलं.''