मुंबई : तामिळनाडूमधून पुण्यात हलविण्यात आलेल्या आयपीएलच्या सहा सामन्यांसाठी स्टेडियमची व खेळपट्ट्यांची देखभाल करण्याकरिता पुणे महापालिकेकडून अतिरिक्त पाणी मागणार का, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला याचे उत्तर देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले.
कावेरीच्या पाणीवाटपावरून तामिळनाडूतील जनतेने आयपीएलविरोधी तीव्र निदर्शने केली. त्यामुळे आयपीएलच्या ‘चेन्नई सुपर किंग्स’ (सीएसके)ला घरच्या मैदानावर सामने खेळता येणार नाहीत. आयपीएलने हे सामने पुण्यात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएच्या पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये सीएसकेचे सहा सामने होणार आहेत.
महाराष्ट्रात एकूण ११ सामने होणार होते. आता आणखी सहा सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त पाणी लागणार. मुळात पुणे शहर व ग्रामीण भागात पाण्याची कमतरता आहे. त्यात आणखी सहा सामन्यांची भर पडली आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांनी एमसीएला पुणे महापालिकेकडून अतिरिक्त पाणी मागणार की नाही, याचे उत्तर देण्याचे निर्देश दिले.
‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या एनजीओने आयपीएलसाठी पाणीपुरवठा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध २०१६ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्या वेळी राज्यात दुष्काळ पडला असतानाही आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमच्या व खेळपट्टीच्या देखभालीसाठी पाणी पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने न्यायालयाने बीसीसीआयला आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचा आदेश दिला होता.
>पुढील सुनावणी १८ एप्रिलला
वानखेडे स्टेडियमला अतिरिक्त पाणीपुरवठा करणार नसल्याचे मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगितले. पुढील सुनावणी १८ एप्रिल रोजी आहे.
Web Title: Will Pune Municipal Corporation ask for additional water?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.