नवी दिल्ली : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पुनर्गठित संघाला आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये कर्णधार के.एल. राहुल व प्रशिक्षक अनिल कुंबळे ही जोडी यश मिळवून देईल का, याबाबत उत्सुकता आहे. पंजाब संघात क्षमता आहे, पण त्यांनी चांगल्या सुरुवातीचा लाभ घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत विदेशी संयोजन उपयुक्त ठरणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
पंजाब संघाने गेल्या वर्षी लिलावामध्ये मोठी रक्कम खर्च केली आणि मधली फळी मजबूत करण्यासाठी व डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीमधील उणिवा दूर करण्यासाठी नऊ खेळाडूंना करारबद्ध केले. मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलने पुनरागमन केले आणि शेल्डन कॉट्रेल व क्रिस जॉर्डन यांच्या रुपाने डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध असल्याचे दिसत आहे. संघाने आपल्या उणिवा दूर केल्याचे भासत आहे. त्यांच्याकडे ख्रिस गेल व लोकेश राहुल यांच्या रुपाने आक्रमक सलामीवीरांची जोडी आहे. त्यानंतर मयंक अग्रवाल आयपीएलमध्ये आपले आंतरराष्ट्रीय यशाची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे.
साखळी फेरीत जास्तीत जास्त सामन्यात मधल्या फळीत मॅक्सवेलच्या साथीला मंदीप सिंग व सरफराज राहण्याची शक्यता आहे. कॉट्रेल व जॉर्डन व्यतिरिक्त वेगवान गोलंदाजीमध्ये अन्य पर्याय मोहम्मद शमी, जेम्स नीशाम, हार्डस विलजोन, दर्शन नळकांडे, अर्शदीप सिंग आणि इशान पोरेल हे आहेत.
खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल राहण्याची शक्यता आहे, पण किंग्ज इलेव्हनकडे आर. अश्विन गेल्यानंतर या विभागात कुठले मोठे नाव नाही. मुजीब जादरान एकमेव मोठे नाव आहे, पण त्याने खेळलेल्या गेल्या पाच सामन्यात केवळ तीन बळी घेतले आहेत. लेग स्पिनर रवी बिश्नोईकडूनही आशा आहेत. त्याने अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली होती.
यंदाचे पर्व राहुलच्या कर्णधारापदाची परीक्षा पाहणारे असेल. सलामीवीर फलंदाज म्हणून गेल्या दोन मोसमात राहुलची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दडपणाच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे व उर्वरित सपोर्ट स्टाफवर अवलंबून राहावे लागेल, असे राहुलने स्पष्ट केले आहे.