नवी दिल्ली : भारताचा आगामी प्रशिक्षक कोण असणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. पण भारताच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच कायम राहणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे. काही प्रसारमाध्यमांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची सल्लागार समिती शास्त्री यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची धुरा सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.
आयएनएस या प्रसारमाध्यमाच्या अहवालानुसार शास्त्री हेच भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार, असे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिका खेळत आहे. पण येत्या काही दिवसांमध्ये बीसीसीआयची सल्लागार समिती प्रशिक्षकपदाबाबतचा निर्णय घेणार आहे. माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, अंशुमान गायकवाड, शांता रंगास्वामी यांचा सल्लागार समितीमध्ये समावेश आहे.
सल्लागार समितीने प्रशिक्षकपदाची निवड करण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीबरोबर चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये विराटने शास्त्री यांनाच प्रशिक्षकपदी कायम ठेवावे, असे सांगितल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सल्लागार समितीने कोहीलीच्या मताचा मान ठेवला असून शास्त्री यांच्याच गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ कायम राहील, असे म्हटले जात आहे.