भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रिषभ पंत शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. मात्र या भयानक अपघातामधून तो बालंबाल बचावला होता. रिषभ पंत दिल्लीतून स्वत: कार चालवत उत्तराखंडमधील रुडकी येथील आपल्या घरी जात होता. त्याचदरम्यान, गुरुकुल नारसन परिरसात त्याची कार डिव्हायडरला आदळून अपघातग्रस्त झाली होती. अशा परिस्थितीत फॅन्सच्या मनता रिषभ पंतबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या भीषण अपघातानंतर बचावलेल्या रिषभ पंतवर ओव्हरस्पिडींगचा गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न ही विचारला जात आहे. फॅन्सकडून त्याच्या फिटनेसबरोबरच अपघातानंतर त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई होणार का? उपचारांसाठी त्याला दिल्लीमध्ये नेणार का? अपघाताच्या घटनास्थळावर आलेल्या फॉरेन्सिक टीमने काय माहिती दिली, याबाबत विचारण होत आहेत.
दरम्यान, या सर्व प्रश्नांची उत्तरं डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, रिषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. कुठलीही गंभीर किंवा घाबरण्यासारखी बाब नाही आहे. तसेच त्याची प्रकृती बरी असल्याने त्याला एअरलिफ्ट करण्याचीही आवश्यकता आहे, असं वाटत नाही.
आता अपघातातून बचावलेल्या रिषभ पंतवर ओव्हरस्पिडिंगची केस होणार का? असं विचारलं असता डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, माझ्या अधिकाऱ्यांनी असं काही घडलं नसल्याचं सांगितलं आहे. केवळ रिषभ पंतच्या डोळ्यावर झापड आल्याने घडलेला हा अपघात आहे. अपघात घडला तेव्हा रिषभ पंत एकटाच कार चालवत होता. अपघातानंतर त्याने सांगितले की, ड्रायव्हिंग करताना डोळ्यांवर झोप आली आणि कार डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर पंत विंड स्क्रिन तोडून बाहेर आला होता. त्यानंतर कारला भीषण आग लागली होती.