सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक खेळवला जात आहे. यानंतर पुढील टी 20 विश्वचषक सामने 2024 मध्ये खेळवले जातील. यादरम्यानच बीसीसीआयच्या ऑल इंडिया सीनिअर सिलेक्शन कमिटीनं सोमवारी न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. यादरम्यान चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांना माध्यमांकडून काही प्रश्न विचारण्यात आले. टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाला न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या दौऱ्यावर जायचं आहे. चेतन शर्मा यांना जेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली 2024 मध्ये टी 20 विश्वचषक संघाचा भाग असतील का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर शर्मा यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.
“कोणत्याही स्पर्धेदरम्यान तुम्ही अशी कशी अपेक्षा करू शकता की चीफ सिलेक्टर एखाद्या खेळाडूशी चर्चा करेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही मोठे खेळाडू आहेत. तर मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करू शकत नाही,” असं चेतन शर्मा म्हणाले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. परंतु ते पुढील विश्वचषक खेळतील का हे येणारा काळच ठरवेल. सध्या भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेच दोन सामने जिंकला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेशसोबत होणार आहे.