नवी दिल्ली: रोहित शर्माच्या खांद्यावर टी-२० पाठोपाठ एकदिवसीय संघाची धुरादेखील सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा संघाचं नेतृत्त्व करेल. तर विराट कोहलीकडे कसोटी संघाचं नेतृत्त्व असेल. रोहितकडे कसोटीत उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहितचं प्रमोशन झाल्यानं आता त्याला कोहलीपेक्षा जास्त पगार मिळणार का, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहचा समावेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ग्रेड ए प्लस यादीत होतो. बीसीसीआयच्या कंत्राटानुसार ए प्लस यादीतील खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. बीसीसीआय कर्णधाराला वेगळा पगार देत नाही. ए प्लससोबत बीसीसीआय खेळाडूंच्या ए, बी आणि सी अशा तीन याद्या तयार करतं. त्यांना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये मिळतात.
आयपीएल २०२२ मधून कोहलीपेक्षा जास्त कमावणार रोहितमुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला आयपीएल २०२२ मध्ये १६ कोटी रुपये मिळतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोहलीला १५ कोटी रुपये मोजून रिटेन केलं आहे. कोहलीच्या पगारात २ कोटींची कपात झाली आहे. त्याआधी त्याला १७ कोटी रुपये मिळायचे.
आयपीएलमधून विराटच्या तुलनेत रोहितची कमाई जास्तरोहित शर्मानं आयपीएलमधून आतापर्यंत १४६.६ कोटींची कमाई केली आहे. याबाबतीत रोहित केवळ एम एस धोनीच्या मागे आहे. धोनीनं आयपीएलमधून १५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम कमावली आहे. १५० कोटींची कमाई करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे. कोहलीनं आयपीएलमधून आतापर्यंत १४३ कोटी रुपये कमावले आहे.