बंगळुरू - भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाची जय्यत तयारी सुरू केली आहे. विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन करीत असलेले जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीनंतरच्या फिटनेसचादेखील आढावा घेण्यात येत आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने राहुल आणि श्रेयसच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली असून, राहुल पूर्णपणे फिट होण्याच्या मार्गावर आहे. तो लवकरच त्याचा मॅच फिटनेस सिद्ध करू शकेल. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर मात्र मॅच फिटनेसपासून बराच दूर असल्याने चिंतेत भर पडली. यंदाचा आशिया चषक वनडे प्रकारात खेळवला जाणार आहे. विश्वचषकाचा सराव व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आशिया चषकावर नजर ठेवून आहे. आशिया चषकापूर्वी काही खेळाडू फिट होऊन संघात परतण्याची अपेक्षा केली जात असताना बुमराह आणि राहुल यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूने आशिया चषक खेळू शकेल, असा फिटनेस कमावलेला नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘राहुलची रिकव्हरी चांगली सुरू आहे. तो एका महिन्यात फिट होईल. शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणे कठीण असते. अय्यर दुखापतीतून संथ गतीने सावरत आहे. अय्यरबाबत खात्रीने काही सांगता येणार नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाची योजना राहुलला आशिया चषकापर्यंत फिट करण्याची आहे. राहुलने विश्वचषकाआधी काही सामने खेळावे असे वाटते. मात्र तो शंभर टक्के फिट होणे गरजेचे आहे. जर झाला नाही तर आयर्लंड दौऱ्यावर त्याच्या फिटनेसची चाचणी घेता येईल. अय्यरला मात्र अजून काही वेळ द्यावा लागणार आहे.’