भारतीय खेळाडूंवर आयसीसीने कठोर कारवाई केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप फायनलवेळी धिम्या गतीने ओव्हर केल्यामुळे भारतीय संघाचे सर्वच्या सर्व मानधन कापण्यात आले आहे. म्हणजेच भारतीय संघाला एकही रुपया मिळणार नाहीय. उलट गिलवर आणखी १५ टक्क्यांचा दंड आकारण्यात आला आहे. शुबमन गिल कॅच आऊट झाला त्यानंतर त्याने ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर केला होता, त्याचा फटका त्याला बसला आहे.
आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या संघावरही ८० टक्के दंड आकारला आहे. आयसीसीने खेळाडू आणि सहकारी स्टाफच्या आचारसंहितेनुसार कलम २.२२ अंतर्गत ओव्हररेट न पाळल्याबद्दल प्रति ओव्हर २० टक्के दंड आकारला आहे. भारताने पाच ओव्हर कमी टाकल्या, तर ऑस्ट्रेलियाने चार. यामुळे भारताचा मॅच फीच्या १०० टक्के आणि कांगारुंचा ८० टक्के दंड आकारण्यात आला आहे.
आयसीसी टेस्टमध्ये ११ खेळाडूंना १५ लाख रुपये आणि राखीव खेळाडूंना साडे सात लाख रुपये देते. गिलला कलम २.७ नुसार दोषी ठरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सामना सुरु असताना कोणत्याही घटनेची सार्वजनिक निंदा किंवा विधान करण्याचा ठपका त्याच्यावर आहे. त्याने झेल घेताना चेंडू जमिनीवर लागल्याचा स्क्रीनशॉट खेळ संपताच सोशल मीडियावर शेअर केला होता.
आता गिलला मॅच फीच्या १०० टक्के दंड झालेला आहेच. परंतू, त्या ट्विटमुळे त्याला १५ टक्के आणखी दंड भरावा लागणार आहे. आता हा दंड कोण भरणार असा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे. १५ लाख मानधनाच्या १५ टक्के म्हणजे २.२५ लाख रुपये गिल स्वत:च्या खिशातून भरणार का? कारण आयपीएल सामन्यात खेळाडुंवरील दंडाची रक्कम या फ्रँचायझी भरतात. यामुळे आयसीसीने केलेला दंड बीसीसीआय भरणार असल्याचे बोलले जात आहे.