सौरव गांगुली. ज्याने खेळाडू घडवले, संघ बांधला. ज्याने आक्रमकपणा दाखवला. अरे ला कारे म्हणण्याची हिंमत दाखवली. ऑस्ट्रेलियासारख्या माजलेल्या संघाला जमिनीवर आणलं. लोटांगण घालायला भाग पाडलं. इंग्लंडमध्ये त्यांच्याच स्टाइलमध्ये टी-शर्ट काढून दाखवलं. अशा बऱ्याच गोष्टी सौरव गांगुली हे नाव घेतल्यावर डोळ्यासमोर तरळून जातात. आता हाच गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. पण त्याची ही दादागिरी आता बीसीसीआयमध्येही खरंच चालणार का, हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे.गांगुलीची एक गोष्ट आठवते. ती फारशी कुणाला माहिती नसावी. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी फलंदाजाने एक फटका मारला. चेंडू थोडा लांब गेला. तिथे झहीर खान क्षेत्ररक्षण करत होता. झहीरने चेंडू पकडून फेकेपर्यंत दोन धावा निघाल्या. गांगुली त्याच्यावर जाम वैतागला आणि म्हणाला एवढ्या मागे काय * *** उभा आहेस का... त्यावेळी समालोचन करत होते, सुनील गावस्कर. गांगुलीने ही शिवी हासडल्यावर गावस्कर हसले. त्यांच्या बाजूला एक विदेशी समालोचक बसला होता. त्या बापड्याला काही कळेच ना. त्याने गावस्करांना विचारले, गांगुली नेमके बोलला तरी काय? त्यावर गावस्कर म्हणाले, मी तुला आता काहीच सांगू शकत नाही. आपण ऑन एअर आहोत. इथून बाहेर गेल्यावर तुला सांगेन.
आता तुम्ही म्हणाल की, हा किस्सा सांगण्याचे प्रयोजन काय? तर कर्णधार म्हणून होता कसा, हा सांगण्याचा हा प्रयत्न होता. हाच कर्णधार खेळाडूंना घडवण्यातही मागे नव्हता. झहीर, हरभजन, सेहवाग, गंभीर, युवराज नावं घेऊ तेवढी कमी आहेत. त्यामुळे 2003च्या विश्वचषकात आपण उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलो होतो. पण ऑस्ट्रेलियाच्या वादळी फलंदाजापुढे नामशेष झालो. गांगुलीचे बरेच किस्से आहेत. अगदी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापासून ते इंग्लंडमधील पदार्पणातील शतकापर्यंत. ऑस्ट्रेलियाने मालिका विजयाचा धडाका लावल्यावर त्यांना थांबवण्यासाठी गांगुलीने खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवला होता. हा किस्सादेखील बऱ्याच जणांना माहिती नसावा. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ तर एवढा हताश झाला होता की, तो चक्क हँडल दी बॉल या नियमामुळे बाद झाला. ही नामुष्की होती. त्याच्यावर आणि संघावर. कारण जो कर्णधार मालिका विजयांचा सपाटा लावतो त्याला लोटांगण घालायला कसे भाग पाडायचे हे गांगुलीने दाखवून दिले होते.
गांगुलीचा क्रिकेटमधला अखेरचा काळ मात्र निराशादायी होता. ऑफ साईडचा देव, अशी बिरुदावली काही जणांनी गांगुलीला बहाल केली होती. पण लेग साईडला त्याची बॅट जास्त तळपली नाही. त्याचबरोबर बाऊन्सरचाही सामना करण्यात गांगुलीची काही वेळा फे फे उडाल्याचे पाहायला मिळाले होते. पण भारताच्या महान फलंदाजांच्या यादीत तोदेखील होताच. भारतीय क्रिकेटला सुवर्णकाळ दाखवणारा सेनापती म्हणजेच गांगुली. पण आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात त्याची दया येत होती. फॉर्म चांगला नसतानाही आपण वयानुसार थांबायला हवं, हे त्याने केलं नाही. खेळण्याचा अट्टहास सुरूच होता. आयपीएलमध्ये तर पुण्याच्या संघातून खेळताना त्याची किव येत होती. पण गांगुली मात्र मैदानाच्या वलयापासून दूर जाऊ पाहत नव्हता. अखेर काही दिवसांनी त्याने क्रिकेटला रामराम ठोकला.
गांगुलीचा अखेरचा सामना अजूनही डोळ्यासमोर आहे. हा सामना नागपूरला झाला होता. समोर होता ऑस्ट्रेलियाचा संघ. भारताने हा सामना 172 धावांनी जिंकला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यावेळी महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. पण धोनीनं या सामन्याच्या अखेरच्या दिवशी गांगुलीकडे कर्णधारपद देऊन त्याचा गौरव केला होता. गांगुली रिटायर झाला, हे काहींना पचवणं कठीण होतं. कारण त्याच्या आक्रमकवृत्तीने बऱ्याच जणांची मनं जिंकली होती. कारण त्यावेळी त्याच्यासारखा आक्रमक कर्णधार भारतामध्ये झाला नव्हता. पण गांगुलीचा हाच आक्रमकपणा, ही दादागिरी बीसीसीआयमध्येही कायम राहणार का, हा खरा प्रश्न आहे.
बीसीसीआयचा अध्यक्ष बनायचं, ही गांगुलीची बऱ्याच वर्षांपूर्वीपासूनची मनीषा होती. त्याला क्रिकेटमध्ये आणणारे जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. भारतीय क्रिकेटमध्ये पैसा आणला तो दालमिया यांनीच. बाकीच्यांनी फक्त पैशांचा ओघ वाढवायची जबाबदारी घेतली. पण सध्याच्या घडीला बीसीसीआय क्रिकेटमधली महासत्ता आहे ती दालमिया यांच्याच पुण्याईमुळेच. गांगुली हा जवळपास दालमिया यांचा मानसपुत्र होता. त्यामुळे गांगुलीने त्यांना जवळून पाहिले होते. त्यामुळेच कदाचित त्याने मनामध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने बंगालच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रवेश केला.बंगालच्या क्रिकेट संघटनेत प्रवेश करताना जगमोहन दालमिया यांच्याबरोबरच्या नात्याचा त्याला चांगला फायदा झाला, उलटपक्षी त्याने तो करून घेतला, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण त्यावेळी दालमिया यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा आता संघटनेचा अध्यक्ष होणार, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण गांगुलीने काय 'काळी' जादू केली कुणास ठाऊक, कारण त्यावेळी गांगुलीला जास्त पाठिंबा मिळाला. सध्या बंगालच्या क्रिकेट संघटनेचा तो अध्यक्ष आहे. पण आता त्याच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.
गांगुली अध्यक्षपदावर विराजमान झाला की त्याला कुणी बसवला, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही परिस्थिती पाहा. आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगनंतर बीसीसीआयची प्रतिमा डागाळली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमध्ये हस्तक्षेप केला. आपला आदर्शवाद आणला. पण आदर्शवाद आणि प्रॅक्टिकल गोष्टी यामध्ये तफावत असते, हेच आपल्या साऱ्यांना पाहायला मिळाले. कारण सर्वोच्च न्यायालयालाही हे प्रकरण तसे डोईजड झाले होते. त्यामुळे त्यांनाही सुटका हवीच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पहिल्यांदाच बीसीसीआयचा अध्यक्ष मोकळेपणाने विराजमान होणार होता. त्यामुळे तो कोण असेल, याचा शोध सुरू झाला. कारण हा चेहराच बीसीसीआयला आपले गतवैभव दाखवण्यात महत्त्वाचा ठरणार होता. बऱ्याच मोठ्या लोकांना बीसीसीआयचे अध्यक्षपद आपल्या मुठीमध्ये ठेवायचे होते. बीसीसीआयची सूत्रं त्यांना हलवायची होती. त्यामुळे अध्यक्षपदावर त्यांचा डोळा होता. बीसीसीआयमधली एक गोष्ट सर्वात आवडते, ती म्हणजे गट-तट असेल, राजकारण आहेच, पण जेव्हा संघटनेचा विचार येतो तेव्हा सारे एकाच गटात असतात. कौरव आणि पांडवांसारखं त्यांचंही आहेच. आता प्रश्न होता तो बीसीसीआयच्या प्रतिमेचा. माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते. पण त्यांच्या या बादशहावर प्रतिस्पर्ध्यांनी सौरव गांगुली नामक एक्का मारला. झालं. मग ठरलं. कारण गांगुलीच्या नावाला कुणीही विरोध करू शकतं नव्हतं. तो माजी कर्णधार, बीसीसीआयमध्येही त्याने समितीवर काम केलं होतं. समालोचन करत होता. प्रशासक म्हणूनही तो काम पाहत होता. अध्यक्षपदासाठी लागणारी धडाडी त्याच्यामध्ये दिसत होती. त्यामुळे गांगुलीचे म्हणतात तसे 36 गुण जमत होते की जमवून आणले, हे सांगणेच न बरे. कारण गांगुलीला अध्यक्षपदी बसवण्यात भारताचे गृहमंत्री अमिश शहा यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते. कारण श्रीनिवासन यांनी जेव्हा ब्रिजेश पटेल यांचे नाव घेतले. त्यावर अडून राहिले. त्यावेळी अनुराग ठाकूर यांनी श्रीनिवासन यांना गांगुली अमित शहा यांना अध्यक्षपदी हवा असल्याचे सांगितल्याचे वृत्त होते. त्यामुळे अमित शहा यांच्या वरदहस्तामुळेच गांगुली अध्यक्ष झाला असे क्रिकेट वर्तुळात म्हटले जात आहे.
राजकारणी लोक कशी असतात, हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. ते एका व्यक्तीला जेव्हा एखाद्या पदावर बसवतात तेव्हा ते त्याच्याकडून काहीही करून घेण्याची धमक ठेवत असतात. भारतामध्ये भाजपाचे सरकार आहे. आता बीसीसीआयमध्येही त्यांची सत्ता आहे. इथेही त्यांना विरोधक नसणार. त्यामुळे आता अमित शहा यांच्यासाठी कुबेराचा हा खजिना खुला झाल्याचे म्हटले जात आहे. आयपीएलसारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी तर आहेच. त्यामुळे आता त्यांची दहा बोटे तुपात आहेत. पण या सर्वात गांगुलीचे काय होणार? तो कळसूत्री बाहुली बनून राहणार की आपल्या मतानुसार आक्रमकपणा दाखवत धडाकेबाज निर्णय घेणार? याचे उत्तर काही दिवसांमध्ये आपल्याला मिळेल. गांगुली हा फक्त दहा महिन्यांसाठीच बीसीसीआय अध्यक्षपदी राहणार आहे. त्यामुळे घोडामैदान जास्त लांब नाही. या दहा महिन्यांमध्ये बीसीसीआयची दिशा आणि दशा स्पष्ट होईल. तोपर्यंत वेट अँड वॉच...