Jay Shah, IND vs PAK ICC Champions Trophy 2025: पुढच्या वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानात खेळायला जाणार नाही, असे बीसीसीआयने ठणकावून सांगितले आहे. तशातच आता जय शाहआयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्येच खेळवली जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
ICC अध्यक्षाचा विशेष अधिकार
आयसीसी अध्यक्षांना अनेक अधिकार असतात. यापैकी एक म्हणजे सामन्यांचे ठिकाण बदलण्याचा विशेषाधिकार. सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय सामान्यत: स्थानिक मंडळाकडे असला तरी, या प्रक्रियेत आयसीसी अध्यक्षांचा सल्ला आणि मान्यता देखील महत्त्वाची असते. सुरक्षेची कारणे, राजकीय अस्थिरता किंवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या असामान्य परिस्थितीमुळे, ICC अध्यक्ष, सदस्य मंडळाच्या संयोगाने, सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. याच कारणास्तव नुकतेच महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण बांगलादेशहून बदलून युएई केले. त्यामुळेच आता जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याची चर्चा जोरात सुरू आहे.
जय शाह १ डिसेंबरला ICC अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी काही योग्य कारणे दिल्यास त्यांच्या इच्छेनुसार सामन्यांचे ठिकाण बदलू शकतो. जय शाह ICC चेअरमन बनल्याची घोषणा होताच अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी वक्तव्ये केली. पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खान याने शाह यांना खेळभावना कायम ठेवण्याचे आवाहन केले आणि भारताला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले. माजी खेळाडू रशीद लतीफही म्हणाला की, पीसीबीने कोणत्याही कारणास्तव जय शाहच्या नियुक्तीला विरोध केला नाही. आता त्यांनी भारतीय संघाला पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठवावे.