नवी दिल्ली : भारतीय संघ आगामी काळात दोन मोठ्या आव्हानांचा सामना करणार आहे. ३० ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरूवात होत आहे, तर ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा होताच भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मदन लाल यांनी एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय संघ आगामी आशिया चषक जिंकेल पण २०२३ च्या विश्वचषकाबाबत काहीही सांगता येणार नाही. मदन लाल यांच्या मते टॉप-६ संघांपैकी कोणताही संघ विश्वचषक जिंकू शकतो, असं त्यांनी म्हटलं.
निवडकर्त्यांनी आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे संघात पुनरागमन झालं आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मालाही संघात स्थान मिळालं आहे. मदन लाल यांच्या मते, भारतीय संघ आशिया चषकामध्ये चांगली कामगिरी करू शकतो पण विश्वचषकाबद्दल काहीही सांगता येत नाही.
माजी खेळाडूचं धक्कादायक विधान
हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना मदन लाल म्हणाले की, मला खात्री आहे की आपला संघ आशिया चषक जिंकेल पण विश्वचषकाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका या संघांपैकी कोणताही संघ जिंकू शकतो. प्रत्येकाला संधी आहे. टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळत आहे, त्यामुळे साहजिकच फायदा होईल. दबाव देखील तितकाच असणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे हे सर्व खेळाडू खूप अनुभवी आहेत आणि त्यांना दडपणाखाली कसे खेळायचे हे माहित आहे. माझी चिंता खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत आहे. एकूणच मदन लाल यांनी खेळाडूंच्या दुखापतीवर चिंता व्यक्त केली.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,
राखीव खेळाडू - संजू सॅमसन
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: Will Team India Win Asia Cup 2023 but ICC ODI World Cup Will Team India Win Or Not Says Former Player Madan Lal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.