Join us

गाबावर ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती होईल? रोहित-विराटकडून मोठ्या अपेक्षा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी कसोटी आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:04 IST

Open in App

ब्रिस्बेन : येथील गाबा मैदानावर आज शनिवारपासून रंगणाऱ्या ऐतिहासिक तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत- ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाले आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय मिळवला आहे. तिसरी कसोटी जिंकून आघाडी घेण्याचा दोघांचाही प्रयत्न राहील. 

भारताने पर्थ कसोटीत २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला; परंतु त्यानंतर डे-नाइट कसोटीत ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. दहा गड्यांनी विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली. भारताच्या आशा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असतील. कोहलीची फलंदाजी सतत कमकुवत होत आहे. गोलंदाजीत प्रमुख वेगवान जसप्रीत बुमराह याला दुसऱ्या टोकाहून तोलामोलाची साथ मिळण्याची गरज आहे. रोहित-कोहलीच्या खराब खेळाचीच चर्चा अधिक आहे. आधुनिक काळातील या महान दिग्गजांसाठी ही कसोटी महत्त्वपूर्ण असेल. दुसरीकडे, यजमान ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज दोघांविरुद्ध उसळी घेणारे आणि हवेत फिरणारे चेंडू टाकण्यास सज्ज झाले आहेत. 

रोहित कोणत्या स्थानावर?    भारताची सर्वांत मोठी समस्या पहिल्या डावातील अपयशी फलंदाजी ठरली. मागच्या वर्षभरात भारतात आणि विदेशात झालेल्या कसोटीच्या सहा डावांत सर्वांत नीचांकी धावा १५० होत्या.      रोहित-कोहली यांनी २०२४-२५ मध्ये पहिल्या डावात  ६.८८ आणि १० च्या सरासरीने धावा केल्या. कोहलीने पर्थच्या पहिल्या कसोटीत शतक ठोकले होते; पण रोहितकडून अद्यापही चांगल्या खेळीची प्रतीक्षा आहे.     पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांच्या प्रत्येक चेंडूवर धाव घेता येत नाही, याची जाणीव रोहितला आहेच. तो पांढऱ्या चेंडूवर धडाका करतो; पण गाबावर लाल चेंडूपुढे मोठी खेळी केल्यास तो आणखी महान फलंदाज बनेल. त्यासाठी स्वत:चा फलंदाजी क्रम निश्चित करावा लागेल.     डावाची सुरुवात करेल की, सहाव्या स्थानावर येईल, हे निश्चित नाही. आघाडीच्या फळीने मंदगती खेळ केल्यास तो मधल्या फळीत जुन्या कुकाबुरा चेंडूवर आक्रमक फटके मारू शकतो.

आकाशदीप की हर्षित राणा...पहिल्या दोन सामन्यांत अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरची कामगिरी समाधानकारक राहिली; पण फलंदाजीचा विचार केल्यास रवींद्र जडेजा उत्कृष्ट पर्याय ठरतो. वेगवान गोलंदाजांमध्ये आकाशदीपमुळे संघात विविधता येत आहे; पण कर्णधाराची पसंती हर्षित राणा आहे. 

बुमराहपुढे यजमान सावधऑस्ट्रेलियालादेखील फलंदाजीची काळजी आहे. हेड हा ऋषभ पंतसारखाच असून स्टीव्ह स्मिथचा फॉर्म चिंतेचा विषय बनला. मार्नस लाबुशेनने ॲडिलेडमध्ये आक्रमक अर्धशतक ठोकले; पण आधीचा लाबुशेन जाणवला नाही. ऑस्ट्रेलियाचे सर्वच फलंदाज बुमराहचा मारा सावधपणे खेळण्याची काळजी घेतात. बुमराहपासून सावध राहिले की अन्य गोलंदाजांकडून धोका नाही, याची त्यांना शाश्वती वाटते.

पावसाचे सावटहवामान खात्याने गाबा येथे पावसासह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी (शनिवारी) ८८ टक्के वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. रविवारी ५८% व सोमवारी ६०% पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी ५५% तर पाचव्या दिवशी १ % पावसाची शक्यता आहे. क्युरेटर डेव्हिड संदुरस्की यांनी म्हटल्याप्रमाणे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. चेंडूला जास्त उसळी मिळेल.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया