मेलबर्न - क्रिकेटच्या मैदानातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने हे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असतात. आता ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे,. मात्र वर्ल्डकपला सुरुवात झाली असतानाच क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आली आहे. सध्या ऑस्ट्रेलियातून येत असलेल्या बातम्यांनुसार हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
टी-२० विश्वचषकातील वेळापत्रकानुसार स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ २३ ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळानुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. क्रिकेटप्रेमीही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणारा हा सामना मुसळधार पावसामुळे रद्द होऊ शकतो. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर एवढा असेल की त्यामुळे नाणेफेक होणेही कठीण मानले जात आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तावच्या संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. आयसीसीने यासंबंधीची तरतूद आधीच करून ठेवली आहे. सुपर १२ फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत पावसाचा व्यत्यय आल्यास सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार नाही.
टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ सहावेळा आमने-सामने आलेले आहेत. त्यापैकी ५ सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तर एका सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली आहे. गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारतीय संघाला पराभूत केले होते.
टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तर भारतीय संघाचा दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी ग्रुप ए मधील रनर अपसोबत, तर तिसरा सामना ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी ग्रुप बीमधील विजेत्यासोबत होईल.