मुंबई - विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कर्णधारपदावरून सुरू असलेल्या शीतयुद्धाला आज नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर पडदा पडू शकतो किंवा वाद अधिक भडकू शकतो. तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तत्पूर्वी आज विराट कोहली प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आज अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. तसेच भारतीय क्रिकेट संघामध्ये नेमकं काय चाललंय याचा अंदाजही क्रिकेटप्रेमींना येऊ शकतो.
भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच विराट कोहली प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. अशा परिस्थितीत या सर्व वादावर उत्तर देऊन चहुबाजूंना सुरू असलेल्या चर्चांना विराट कोहली नवी दिशा देऊ शकतो. प्रत्येक दौऱ्याआधी कर्णधाराची पत्रकार परिषद होत असते. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ १६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. विराट कोहली या दौऱ्यात कुटुंबासह जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. शेवटचा कसोटी सामना हा ११ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. त्याच दिवशी विराटची कन्या वमिका हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळेच विराट कोहली १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमधून विश्रांती घेण्याची शक्यता आहे. तसेच तो कुटुंबासह सुट्टीवर जाऊ शकतो.
दरम्यान, दुखापतीमुळे रोहित शर्माने कसोटी मालिकेमधून माघार घेतली आहे. त्याला याच दौऱ्यापासून अजिंक्य रहाणेच्या जागी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मुंबईमध्ये सराव करत असताना रोहितला दुखापत झाली होती. त्याच्या जागी प्रियंक पंचाल याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.