गुवाहाटी - भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 टी-20 सामन्यांपैकी 10 सामने जिंकले आहेत. त्यात सलग 7 सामने जिंकण्याची कामगिरी केली. भारताने 28 सप्टेंबर 2012 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही टी-20 सामना गमावलेला नाही. भारताविरोधात खेळलेल्या 14 टी 20 सामन्यात कांगारुनं आठ कर्णधार बदलले आहेत. डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा भारताविरोधातील आठवा कर्णधार होता. तर यादरम्यान भारताचे फक्त दोन कर्णधार झाले आहेत. धोनीनंतर विराट कोहलीनं कर्णधार म्हणून आपली छाप उमटवली आहे.
नियमीत कर्णधार स्मिथ दुखापतीमुळे टी-20 मालिकेला मुकला आहे. त्याच्याजागी डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाजी सुत्रे हातात आली आहेत. रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्यानंतरही भारतानं आपला विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव व चहल यांच्या मा-याला सामोरे जाता आले नाही.
ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे; पण तरी ते अपयशी ठरले, ही आश्चर्याची बाब आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मॅक्सवेल, फिंच, नॅथन कुल्टर नाईल, ट्रेव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स,केन रिचर्डसन, अॅडम जम्पा, मार्क्स स्टोइनिस, अॅण्ड्र्यू टाय यांना आयपीएलचा अनुभव असतानाही ते ऑस्ट्रेलियाचा पराभव रोखू शकले नाहीत. कर्णधार स्मिथ दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याने आता सर्व दारोमदार फिंच व वॉर्नर या सलामी जोडीवर आहे. हे दोन्ही सलामीवीर फ्लॉप झाले तर ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर पडणे कठीण जाईल. तरीही ऑस्ट्रेलियन फलंदाज यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतील. नॅथन कुल्टर नाईलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचा फिरकी मारा निष्प्रभ ठरल्याचे दिसतेय.
दुसरीकडे भारतीय संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आहे. रांचीमध्ये हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह महागडे ठरत असताना यादव व चहल यांनी धावगती नियंत्रणात राखली. फलंदाजीमध्ये आघाडीच्या तिघांनी आपली भूमिका चोख बजावली होती. पावसामुळे सहा षटकांच्या सामना असल्यामुळे इतर फलंदाजांना यश आले नाही. मात्र फलंदांजी हा पहिल्यापासूनच भारताचा प्लस पॉईंट आहे. पहिल्या लढतीत शिखर धवननं फटकेबाजी करत झक्कास पुनरागमन केलं. आघाडीची फळी लवकर माघारी परतली तरी मनिष पांडे, धोनी, हार्दिक आणि केदार जाधव संघाला मोठी धावसंख्या उभा करुन देऊ शकतात. भारतीय संघाची सद्याची कामगिरी पाहाता ऑस्ट्रेलिया भारताचा विजयी अश्वमेध रोखू शकेल का? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पण टी-20 च्या या छोट्या प्रकारात काहीही होऊ शकते. एक षटक सामन्याचा निकाल फिरवू शकते.