नवी दिल्ली-
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि याआधीचे अध्यक्ष देखील माजी क्रिकेटपटू होते. मग भविष्यात तूही बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पाहायला मिळणार आहेस का? असं सचिनला विचारण्यात आलं असता त्यानं अगदी मजेशीर उत्तर दिलं.
"मी वेगवान गोलंदाजी करत नाही", असं सचिन म्हणाला. (रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली मध्यम गतीनं गोलंदाजी करायचे) एका दौऱ्यात जेव्हा गांगुलीनं विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा तो 140kmph गतीनं गोलंदाजी करण्याचं बोलत होता. पण त्यानंतर त्याची कंबर दुखायला लागली होती. सचिननं याच मुद्द्यावर भाष्य करत मी १४० च्या गतीनं गोलंदाजी करू शकत नाही असं मिश्किलपणे म्हटलं आणि बीसीसीआय अध्यक्षपदाच्या प्रश्नाला टाळलं. नवी दिल्लीत इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२३ मध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित होता. 'Sachinism and idea of india' या विशेष कार्यक्रमात सचिन बोलत होता.
सचिननं सांगितला मजेशीर किस्साहजरभजन सिंगला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाचा एक किस्सा सचिननं सांगितला. "मी जेव्हा पहिल्यांदाच मोहालीत हरभजनला पाहिलं होतं तेव्हा मला एकानं सांगितलं की भज्जी दुसरा खूप चांगला टाकतो. ही ९० च्या दशकातील गोष्ट आहे. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर तो रनअपसाठी न जाता थेट माझ्याकडे यायचा. जेव्हा तो नंतर टीममध्ये आला तेव्हा मी त्याला विचारलं. तेव्हा मला कळालं की मी प्रत्येक बॉल खेळल्यानंतर हेल्मेट नीट करण्यासाठी डोकं हलवायचो तर हरभजनला वाटायचं की मी त्याला बोलावतोय. त्यामुळे तो प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर माझ्याजवळ यायचा", असं सचिन म्हणाला.
वनडे क्रिकेटचं भविष्य काय?वनडे क्रिकेट आता कंटाळवाणं वाटू लागलं आहे हे खरं आहे असं सचिननंही कबुल केलं. "जेव्हा तुम्ही ५० षटकांच्या सामन्यातच दोन चेंडू घेता. तेव्हा तुम्ही रिव्हर्स स्विंग संपुष्टात आणता. त्यात ५ खेळाडू ३० यार्डाच्या आत राहत असतील तर फिरकीपटूंना खूप अडचण निर्माण होते. कारण त्यांना मोकळेपणानं गोलंदाजी करता येत नाही. वनडे क्रिकेट कंटाळवाणं होतंय हे खरंच, ते जिवंत करणं गरजेचं आहे", असं सचिन म्हणाला.