Join us  

मी सर्वच प्रकारांत खेळण्यास इच्छुक, कोणालाही जमले नाही, असे यश मिळवणार: रोहित शर्मा

तथापि, हे सांगताना रोहित थोडा अडखळलादेखील.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 7:59 AM

Open in App

सेंच्युरियन : ‘माझ्यापुढे क्रिकेटचा जो काही प्रकार उपलब्ध असेल त्यात मी खेळत राहणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी टी-२० विश्वचषक खेळणार का, या प्रश्नाच्या उत्तरात उपरोक्त विधान केले. तथापि, हे सांगताना रोहित थोडा अडखळलादेखील. 

रोहित पुढे म्हणाला, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आमचा संघ सज्ज आहे. येथे याआधी भारतीय संघाला अनेकदा अपयश पचवावे लागले. पण यावेळी आम्हाला असे यश मिळवायचे आहे, जे अन्य कोणालाही मिळवता आले नव्हते. दक्षिण आफ्रिकेत १९९२ साली पहिली कसोटी मालिका खेळल्यापासून भारतीय संघाला अद्याप तिथे एकही मालिका जिंकता आलेली नाही. मात्र, यावेळी हे अपयश पुसून टाकण्याच्या निर्धाराने रोहित सेना मैदानात उतरणार आहे. 

पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित म्हणाला की, ‘मला असा विजय मिळवायचा आहे, जो जगातील या भागामध्ये अद्याप मिळवता आलेला नाही.’ यावेळी रोहितला त्याच्या भविष्यातील क्रिकेटबाबतही विचारण्यात आले, मात्र यावर बोलण्यास स्पष्टपणे नकार देताना त्याने केवळ खेळाचा आनंद घ्यायचा असल्याचे म्हटले. रोहित म्हणाला की, ‘माझ्यासाठी जितके क्रिकेट शिल्लक राहिले आहे, ते खेळू इच्छितो.’

लोकेश राहुलच्या यष्टिरक्षणाबाबत रोहितने सांगितले की, ‘लोकेश राहुल किती काळापर्यंत यष्टिरक्षण करण्यास प्राधान्य देईल, हे मला माहीत नाही. पण, सध्या तो यष्टिरक्षणासाठी उत्सुक आहे.’ त्याचप्रमाणे, या मालिकेत मोहम्मद शमीची कमतरता भासणार असल्याचेही रोहितने म्हटले. शमीच्या अनुपस्थितीबाबत रोहित म्हणाला की, ‘शमीने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कामगिरीकडे पाहता, नक्कीच त्याची या मालिकेत कमतरता भासेल. कोणालातरी त्याच्या जागी खेळवावे लागेल, पण हे सहजसोपे ठरणार नाही.’

 

टॅग्स :रोहित शर्मा