Rohit Sharma, IND vs BAN 2nd Test: बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एक वेगळीच रणनीती वापरली. तीन दिवसांचा खेळ वाया गेल्यावर अखेरच्या दोन दिवसात सामन्याचा निकाल लागणे अनेकांना अशक्य वाटत होते. पण भारताने आधी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला. त्यानंतर टी२० सारखी फलंदाजी करत अवघ्या ३४.४ षटकांत ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर पुन्हा बांगलादेशला १४६ धावांत गुंडाळले आणि ९५ धावांचे आव्हान पार करत सामना जिंकला. रोहितच्या या रणनीतीवर ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॅडीन फिदा झाला.
ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून रोहितचे कौतुक
"रोहित शर्मा कायमच आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्वासाठी ओळखला जातो. त्याच्या डोक्यात सर्वप्रथम विजयाचा विचार असतो मग इतर गोष्टींचा विचार येतो. दुसऱ्या कसोटीत ते अगदी त्याचप्रकारे खेळले. त्यामुळेच मॅच ड्रॉ होणार असे अनेकांना वाटत असताना त्याने मात्र टीम इंडियाला विजयाची संधी मिळवून दिली. मला क्रिकेटची ही स्टाईल खूप आवडली. भारताने संयमी क्रिकेट खेळून सामना ड्रॉ केला असता तरी त्यांच्यावर कुणीच टीका केली नसती. पण रोहित शर्माची विचार करण्याची पद्धत म्हणजे सामन्याचा निकाल लागला पाहिजे. वेगाने धावा करुन मोठा स्कोअर करायचा, त्यानंतर बांगलादेशला पुन्हा फलंदाजीला आणायचं नी शेवट मिळेल ते टार्गेट गाठण्याचा प्रयत्न करायचा हा रोहित आणि कंपनीचा प्रयत्न होता. हल्ली टी२० क्रिकेटमुळे वेगाने धावा करणे हे फारसे कठीण नसते. त्याचाच वापर या सामन्यात झाला. टीम इंडियाने अशा परिस्थितीत विजयाचा विचार केला आणि त्यात ते यशस्वी झाले म्हणूनच मी रोहित शर्माला सलाम करतो," अशा शब्दांत हॅडीनने रोहितची स्तुती केली.
सामन्यात रोहितची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
कर्णधार रोहित शर्माने ११ चेंडूमध्ये २३ धावांची छोटेखानी खेळी केली. पण विशेष बाब म्हणजे या डावात त्याने जी खेळी केली, त्यात त्याने सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी केली. रोहित शर्माने आज आपल्या डावाची सुरुवात सलग दोन चेंडूत दोन षटकार मारून केली. भारतीय संघाकडून खेळताना आपल्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार मारण्याची किमया केवळ दोन फलंदाजांनी केली होती. त्यापैकी एक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे वेगवान गोलंदाज उमेश यादव. सचिनने २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरूद्ध हा पराक्रम केला होता. तर उमेश यादवनेही २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच हा कारनामा केला होता. आज त्यात रोहित शर्माची भर पडली.
अशी रंगली दुसरी कसोटी
दुसऱ्या कसोटी मोमीनुल हकच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने सर्वबाद २३३ धावा केल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने ७२ (५१), केएल राहुल ६८ (४३), विराट कोहली ४७ (३५) आणि रिषभ पंत ३९ (३६) या चौघांच्या दणकेबाज खेळींच्या जोरावर भारताने ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांत आटोपला. बुमराह, अश्विन, जाडेजाने ३-३ बळी घेतले. अखेर चौथ्या डावात मिळालेले ९५ धावांचे आव्हान भारताने यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.