दडपण झुगारण्याची मानसिकता बाळगून विश्वचषक जिंका !

विश्वचषकासाठी संघाची घोषणा झाली. काही जोडलेल्या आणि वगळलेल्या खेळाडूंवरून निवडकर्त्यांना धारेवर धरले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:16 AM2022-09-18T05:16:02+5:302022-09-18T05:16:47+5:30

whatsapp join usJoin us
Win the World Cup with the mindset of resisting pressure! | दडपण झुगारण्याची मानसिकता बाळगून विश्वचषक जिंका !

दडपण झुगारण्याची मानसिकता बाळगून विश्वचषक जिंका !

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन

ऑस्ट्रेलियाविरुद्ध  आगामी टी-२० मालिका ही भारतीय संघासाठी कठीण आणि महत्त्वपूर्ण परीक्षा असेल. विश्वचषषक सुरू होण्यास पाच आठवडे शिल्लक आहेत. या प्रकाराच्या तयारीसाठी विद्यमान जगज्जेत्यांविरुद्ध खेळायला मिळणे, याहून चांगली तयारी असू शकत नाही. भारत सध्या टी-२० त अव्वल स्थानावर आहे. आशिया चषकात भारत स्वत:च्या चुकांमुळे अंतिम फेरीत खेळू शकला नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतींना आणखी महत्त्व प्राप्त झाले.

विश्वचषकासाठी संघाची घोषणा झाली. काही जोडलेल्या आणि वगळलेल्या खेळाडूंवरून निवडकर्त्यांना धारेवर धरले जात आहे. हे नेहमीचेच आहे. संघ निवडीनंतर वाद निर्माण होणे आधीही वेगळे नव्हते, आताही नाही. पण ज्यांची निवड झाली त्यांच्यावर आपण या जागेसाठी पात्र आहोत, हे दाखवून देण्याचे दडपण असेल.

निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केलेल्यांमध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिलेल्या चहरचा अपवाद वगळता    इतर तिघेही राष्ट्रीय संघातून तसेच आयपीएलमध्ये यशस्वी ठरले आहेत. साहजिकच, चौघांनाही विश्वचषकासाठी राखीव ठेवण्यात आले.  ऑस्ट्रेलिया आणि  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मात्र त्यांना खेळण्याची संधी देण्यात आली. २०२०-२१च्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ ने अविस्मरणीय विजय साजरा केल्यापासून भारताचा ट्रॅक रेकॉर्ड निराशादायी ठरला.  गतवर्षी  इंग्लंडमध्ये विराटच्या नेतृत्वात आपला संघ न्यूझीलंडकडून डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पराभूत झाला. 

पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतही कसोटी मालिका १-२ ने गमावली. खरे तर ही मालिका ३-० अशी जिंकायला हवी होती. यंदा जुलैमध्ये रोहितच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये पाचवी कसोटीही गमावली. त्याआधी यूएईत टी-२० विश्वचषकात भारताला बाद फेरीही गाठता आलेली नव्हती. नुकत्याच झालेल्या सहा संघांच्या आशिया चषकातही भारत फायनलपासून वंचित ठरला.   भारत धोनीच्या नेतृत्वाखाली २०१५ (वन डे विश्वचषक) आणि  २०१६ (टी-२० विश्वचषक) तसेच २०१९ एकदिवसीय विश्वचषक (कोहलीच्या नेतृत्वाखाली), उपांत्य फेरीत बाहेर पडला. भारताने आशिया चषकाव्यतिरिक्त बहुराष्ट्रीय स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ ला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होती.

विजयी सुरुवात करूनही भारताला मोठ्या स्पर्धांमध्ये अनेकदा नुकसान सोसावे लागले आहे. उदा. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध विजयी सलामी दिल्यानंतर सुपर फोरमध्ये आपण मोक्याच्या क्षणी पराभूत झालो. संघात प्रतिभा असली तरी मानसिक कणखरता आणि संकटात  शांतचित्त खेळण्याची क्षमता बाळगणे ही खरी समस्या आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना विश्वचषकासाठी सज्ज होण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

राहुल, बुमराह, हर्षल पटेल हे दुखापतीतून नुकतेच परतले. त्यांचा विश्वचषक संघात समावेश झाला. दुसरीकडे वगळलेल्यांना राखीव फळीत स्थान मिळाले. विश्वचषकाआधी राखीव फळीतील एखाद्याने नेत्रदीपक कामगिरी केल्यास त्याला संघात स्थान दिले जाईल? यामुळे इतर खेळाडूंमध्ये धडकी भरणार? दुखापती, फॉर्म, फिटनेस हा चिंतेचा विषय असला तरी, माझ्या मते, विश्वचषकात भारतीय संघासमोरील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे खेळाडू हे वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीसाठी दडपणाचा सामना करण्यास मानसिकदृष्ट्या तयार आहेत की नाहीत.
 

(लेखक लोकमतमध्ये कन्सल्टिंग एडिटर आहेत)

Web Title: Win the World Cup with the mindset of resisting pressure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.