Join us  

टीम इंडिया, रोहितसाठी हा विश्वचषक जिंका! भारताचा 'आक्रमक' कर्णधार

भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत भिडणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 6:52 AM

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

आज हे लिहिण्याची इच्छा झाली. कारण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. त्यामुळे रोहितप्रति असलेली भावना व्यक्त करण्याची संधीच हिरावली जाईल, असे नको व्हायला.  कर्णधार म्हणून ६० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांपैकी ४८ जिंकून विश्वविक्रमाशी बरोबरी करणारा, विश्वचषकात सलग सहा सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार, आयपीएलमध्ये मुंबईला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा कर्णधार, भारतीय संघाला मागील एकदिवसीय विश्वचषकात दिमाखात अंतिम फेरीत नेणारा आणि या टी-२० विश्वचषकात आपल्या फलंदाजी व जादुई नेतृत्त्वाचे प्रदर्शन करणारा रोहित शर्माच आहे, ज्याच्यासाठी भारतीय संघाने हा विश्वचषक समर्पित करावा.

आक्रमक कर्णधाररोहितच्या आक्रमक नेतृत्त्वामुळेच भारतीय संघ वेगळा ठरला आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजांवर हल्ला व त्यानंतर खेळाडूंना आक्रमक खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे, गोलंदाजीत सातत्याने बदल करणे व भक्कम क्षेत्ररक्षणाद्वारे फलंदाजांना दबावात आणणे, हीच त्यांची रणनीती राहिली आहे. याच रणनीतीने रोहितसह संघातही बदल घडवला. संघात अनेक सामना विजेते आहेत, जसे ऋषभ पंत किंवा हार्दिक पंड्या. दोघेही सातत्याने आक्रमक खेळतात. शिवम दुबेचे योगदानही बऱ्यापैकी आहे.  गोलंदाजीत बुमराह, अर्शदीप व कुलदीप यांनी प्रत्येक वेळी शंभर टक्के योगदान देऊन विजय मिळवला आहे.

अप्रतिम स्मार्ट खेळीरोहित शर्मा मुलाखतींमध्ये सतत सांगतोय की, ‘आम्ही स्मार्ट क्रिकेट खेळतोय आणि आपल्या वैयक्तिक विक्रमांची चिंता करत नाही. आम्ही फक्त जिंकण्यासाठी खेळतोय.’ स्वतः त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सोमवारी फक्त ४१ चेंडूंमध्ये ९२ धावा ठोकत हे दाखवून दिले. त्याने थोडे संथ खेळत शतकही पूर्ण केले असते. पण, त्याच्यासाठी शतकापेक्षा जास्त महत्त्वाचे होते वेगाने धावा करून भारतीय धावसंख्या भक्कम करणे.

पहिली फलंदाजी...भारताने पाक, अफगाण, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांना प्रथम फलंदाजी करून हरवले. याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, विंडीज खेळपट्टीवर चेंडू दुसऱ्या डावात संथ होतात. त्यामुळे आक्रमक फटके मारणे कठीण होते. दुसरे म्हणजे, बुमराह, अर्शदीप व कुलदीप यांच्याविरूद्ध फलंदाज मोकळेपणाने धावा करू शकत नाहीत. सिराजऐवजी कुलदीपला खेळविण्याचा रोहितचा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरला.

आता तरी जागे व्हा कोहली-जडेजा!भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू विराट कोहली आणि रवींद्र जडेजा अद्याप लयीत आलेले नाहीत. पण, उपांत्य सामन्यात दोघे आपल्या लौकिकानुसार खेळले, तर भारताला अंतिम फेरीपासून कोणीही रोखू शकत नाही. दोघेही मोठ्या सामन्याचे खेळाडू आहेत. त्यांच्याकडून आपण उपांत्य फेरीत धमाकेदार खेळाची अपेक्षा करू शकतो. 

टॅग्स :रोहित शर्माट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड