चेन्नई : ‘तुम्हाला निर्धारीत लक्ष्य गाठायचे असेल तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसारखी कठोर मेहनत घ्यायला हवी,’ असा सल्ला वेस्ट इंडिजचे सहाय्यक प्रशिक्षक रोडी एस्टविक यांनी आपल्या खेळाडूंना दिला आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी एस्टविक यांनी हेटमायर, निकोलस पूरन या सारख्या खेळाडूंनी कोहलीकडून शिकायला हवे असा सल्ला दिला.
ते म्हणाले,‘ आमच्या संघात हेटमेयर, पूरन व होप सारखे खेळाडू आहेत. हे खेळाडू चांगली प्रगती करु शकतात. मात्र यासाठी कठोर मेहनत घ्यायला हवी. विराटकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तो कठोर मेहनत घेतो. मेहनतीशिवाय तुम्हाला यश मिळू शकत नाही. या दौºयात खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही आराम करु शकत नाही.’
एस्टविक पुढे म्हणाले,‘आम्ही या दौऱ्यात चांगली कामगिरी केली. आमच्या खेळाडूंनी मेहनत घेतली आहे. त्याचे परिणाम त्यांना आता दिसतील. टी२० मधील खेळ खूप रोमाचंक होता. हेटमायरने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे मोठी गुणवत्ता आहे. कमी वयात त्याने एकदिवसीय सामन्यात चार शतक झळकावली आहेत. ते म्हणाले,‘आम्ही आमच्या कामगिरीवर आनंदी आहोत. आम्ही भारत व आमच्यातील अंतर कमी करण्यात यशस्वी ठरलो. एकदिवसीय सामन्यातही अशीच कामगिरी होईल.’ (वृत्तसंस्था)