वेस्ट इंडिजपुढे सर्वांत मोठे आव्हान ५० षटकांच्या सामन्यात प्रभावी कामगिरीचे आहे. कसोटी क्रिकेटसाठी त्यांच्याकडे वेगळे खेळाडू आहेत. वन-डे साठी मात्र या संघापुढे अनेक प्रश्न उभे आहेत.
विंडीजची सर्वांत मोठी चिंता अशी की, हा संघ चांगल्या सुरुवातीचा पुढे लाभ घेत नाही. त्यांच्याकडे ‘पॉवर हिटर’ आहेत, हवेत चेंडू वळविणारे वेगवान गोलंदाजदेखील आहेत, तरीही निकाल बाजूने येण्यासाठी या संघाकडे ठोस ‘गेम प्लान’ नाही.
एखादा संघ ५० आणि २० षटकांच्या सामन्यात एकसारख्या योजनेसह उतरत असेल तर त्यांना त्रास होणारच. टी-२० प्रकारात त्यांचा दिवस असेल तर जगातील कुठल्याही संघाला हा संघ पराभूत करू शकतो. मात्र, त्यांचा दिवस नसेल तर कमकुवत संघाकडूनही हा संघ पराभूत होतो. असे आम्ही वारंवार पाहिले आहे. येथे त्यांना वेगळ्या डावपेचांसह खेळून कठीण स्थितीत संयमी निर्णय घ्यावे लागतील.
दुसरीकडे भारतीय संघाची प्रगती देदीप्यमान दिसत आहे. दिवसागणिक कामगिरी अधिक प्रभावी होत आहे. शिखर धवन आणि बुमराहच्या समावेशानंतर भारतीय संघ जगात आणखी संतुलित संघ होणार
आहे. बुमराह जखमी असून, त्याचा पर्याय प्रभावी ठरताना दिसत नाही. विदेशात भारताला हे महागडे ठरू शकते.
जखमी भुवनेश्वरची देखील उणीव जाणवेल. वन-डे मालिकेत भुवीची अनुपस्थिती दुर्दैवी म्हणावी लागेल. पुढील मालिकेत मात्र बुमराह आणि हार्दिक पांड्या यांचे पुनरागमन सुखावह ठरेल. भारतीय संघाचे सर्वोत्कृष्ट संयोजन मी नेहमी पाहू इच्छितो. हा संघ जखमांपासून दूर राहिल्यास वन-डे क्रिकेटवर अधिराज्य गाजवू शकतो.
मागील दोन दिवसांपासून चेन्नईत पाऊस सुरू आहे. चाहत्यांसाठी हे निराशादायी आहे. खेळपट्टी आणि मैदान ओले झाल्याने चेंडूची गती मंदावते. हवामान चांगले राहिल्यास पहिल्या वन-डेत २५० धावा पुरेशा ठरतील. भारतीय संघाचे पारडे जड असले तरी पांढऱ्या चेंडूवर विंडीज संघदेखील कधीही करिश्मा करू शकेल, यात शंका नाही. (टीसीएम)
कृष्णम्माचारी श्रीकांत लिहितात
Web Title: Windies will have to came with a 'game plan'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.