ऑस्ट्रेलियाच्या ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांत तंबूत परतला अन् ऑसींनी २०९ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा उंचावली, तर भारताला सलग दुसऱ्यांदा WTC Final मध्ये उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताच्या या पराभवानंतर सुनील गावस्कर, रिकी पाँटिंग यांनी प्रथम गोलंदाजी करण्याच्या अन् आर अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर टीका केली. पण, त्याचवेळी BCCI चा माजी अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) कर्णधार रोहित शर्माची ( Rohit Sharma) पाठराखण केली.
आदर्श ! संजू सॅमसन IPL मधील कमाईतील २ कोटी स्थानिक खेळाडूंसाठी करतोय खर्च
आज तक ला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला,''विराट कोहलीने जेव्हा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी रोहित हाच उत्तम पर्याय निवड समितीसमोर होता. रोहितने पाच आयपीएल जेतेपद पटकावली आहेत. त्याला नेतृत्व करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने बाजी मारली होती. आशिया चषक स्पर्धेतही त्याने ही कमाल करून दाखवली होती.''
मुंबई इंडियन्ससाठी पाच आयपीएल जेतेपदं जिंकणाऱ्या रोहितचं महत्त्व गांगुलीने पटवून दिले. असे करताना त्याने रोहित व विराट कोहली यांच्यातील कर्णधारपदाच्या शैलीची तुलना केली. दोन महिने आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करणे हे वर्ल्ड कपसारख्या कमी कालावधीच्या स्पर्धेपेक्षा आव्हानात्मक असल्याचेही गांगुलीने म्हटले. ''तो यंदाची WTC Final खेळला. तो हरला, परंतु २०२१च्या फायनलमध्येही हाच निकाल लागला होता. त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. त्याची वैयक्तिक कामगिरी चांगली झाली नाही, असे मला वाटते. पण, २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आपण साखळी फेरीतच अडखळलो होतो. माझा रोहितवर पूर्ण विश्वास आहे,''असे गांगुली म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की,''महेंद्रसिंग धोनीप्रमाणे रोहितनेही पाच आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत. आयपीएल जिंकणे सोप्पी गोष्ट नाही. ही खूप आव्हानात्मक स्पर्धा आहे. मी दोन वर्षापासून ही लीग जवळून पाहतोय. वर्ल्ड कपपेक्षा आयपीएल जिंकणे अवघड आहे. कारण, येथे साखळी फेरीत तुम्हाला १४ सामने खेळावे लागतात, त्यानंतर प्ले ऑफचा सामना असतो. वर्ल्ड कपमध्ये तुम्ही ४-५ सामन्यानंतर थेट उपांत्य फेरीत पोहोचता. आयपीएलमध्ये १६-१७ सामन्यानंतर तुम्ही चॅम्पियन बनता. रोहित हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे मला आजही वाटते.''