Join us

ऑस्ट्रेलियात विजयी पताका हे द्रविडच्या मेहनतीचे फळ; जाणून घ्या, त्याने नेमके काय केले?

राहुल द्रविड सध्या  राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद भूषवित आहे. द्रविड भारतीय क्रिकेटसाठी जे काही करतोय ते कोणीच यापूर्वी केलेले नाही, असे मुळीच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 07:37 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात भारताने कसोटी मालिका २-१ने जिंकली. ऋषभ पंत आणि वाॅशिंग्टन सुंदर विजयाकडे कूच करीत असताना ‘द वॉल’ राहुल द्रविडला पुढची पिढी यशस्वीरीत्या घडविल्याचे समाधान वाटले असेल. १९ वर्षांखालील तसेच भारतीय ‘अ ’संघाची सूत्रे द्रविडने स्वीकारली त्या घटनेला आता सहा वर्षे झाली. पंत आणि वॉशिंग्टन पहिल्या तर शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी.राहुल द्रविड सध्या  राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद भूषवित आहे. द्रविड भारतीय क्रिकेटसाठी जे काही करतोय ते कोणीच यापूर्वी केलेले नाही, असे मुळीच नाही. २०१५ला जगमोहन दालमिया बीसीसीआय प्रमुख असताना दिलीप वेंगसरकर एनसीए प्रमुख होते. त्यांनी देशातील ग्रामीण भागात क्रिकेटपटू शोधमोहीम सुरू केली. रैना, धोनी, हरभजन यांच्यासारखे खेळाडू याच शोधमोहिमेतून गवसले. द्रविडने उच्च दर्जाच्या सोयीसुविधांसह आधुनिक तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षणावर जोर दिला. १९ वर्षांखालील प्रत्येक झोनमधील खेळाडूंचा त्याने साप्ताहिक कामगिरी अहवाल तयार केला. याशिवाय करारबद्ध खेळाडूंचा पूल ३० खेळाडूंपर्यंत नेण्यास बोर्डाला पटवून सांगितले. या योजनेचा परिणाम २०१६ ला अनुभवायला मिळाला. ३३ वर्षांचा नमन ओझा याला भारतीय ‘अ’ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळून संजू सॅमसनला संघात संधी देण्यात आली. पुढे याच खेळाडूंना सीनियर राष्ट्रीय संघातून संधी देण्याची योजना निवडकर्त्यांना आखता आली. यासंदर्भातही निवडकर्ते द्रविडचा सल्ला घेण्यास मागेपुढे पाहात नसत. बीसीसीआयनेही एनसीए आणि अ संघाच्या वर्षातील दोन दौऱ्याचे बजेट वाढवून  दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेला विजय बीसीसीआय, निवडकर्ते आणि एनसीएने घेतलेल्या संयुक्त मेहनतीचे फळ ठरले. एनसीएत आलेल्या खेळाडूंमध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांच्या कर्तृत्वाला तसेच मेहनतीला प्रोत्साहन देणारा राहुल द्रविड पडद्यामागील खरा हिरो आहे. त्याच्यासारख्यांमुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात असल्याची खात्री अनेकांना पटली.द्रविडने नेमके काय केले... आधुनिक तंत्रज्ञान आधारित सराव आणि फिटनेसवर भर दिला. १९ वर्षांखालील प्रत्येक झोनमधील खेळाडूंच्या कामगिरीचा साप्ताहिक प्रगती अहवाल तयार केला. ‘अ’ संघासाठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंचा पूल ३० पर्यंत नेला. भारत ‘अ’ संघाचा विदेश दौरा वर्षातून दोनदा होईल, याची सोय केली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा दर्जा सुधारला.खेळाडू शोधले, जडणघडणही केली -खेळाडूंमधील कौशल्य विकास, तंत्र आणि शारीरिक फिटनेस सुधारणे या मुद्यांवर भर देण्यात आला. एखादा खेळाडू   सरावादरम्यान आठवड्यात किती फटके खेळला. किती चुका झाल्या आदींचा लेखाजोखा द्रविडने ठेवला. त्या खेळाडूच्या चुका सुधारल्या. खेळाडू सामन्यादरम्यान कसा वागतो, याचाही शोध घेत पुढे त्या खेळाडूला अ संघातून खेळविण्याचा प्रयोग केला. मोहम्मद सिराज आणि मयांक अग्रवालसारख्या खेळाडूंना काही वेळा ‘अ’ संघात न खेळवता स्थानिक क्रिकेटचा अनुभव घेण्यास वाव दिला.

टॅग्स :राहूल द्रविडभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया