मुंबई : आयपीएलमध्ये सातत्याने अपयशी सुरुवात करणाऱ्या पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सपुढे यंदा विजयी सुरुवात करण्याचे आव्हान असेल. मुंबई इंडियन्स रविवारी आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानाला सामोरे जाईल. मुंबईने यंदा कर्णधार रोहित शर्मासह, किएरॉन पोलार्ड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असलेली कोअर टीम कायम राखली आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात सूर्यकुमार खेळणार नसला, तरी उर्वरित प्रमुख खेळाडू मुंबईला विजयी सुरुवात करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.
मुंबईकडून रोहित-ईशान अशी जबरदस्त आक्रमक सलामी जोडी मैदानात उतरणार असल्याने, दिल्लीच्या गोलंदाजांना सांभाळून मारा करावा लागेल. त्याच वेळी सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत मुंबईला मधल्या फळीत जबाबदारीने खेळावे लागेल. अशा वेळी पोलार्डचा अनुभव मुंबईसाठी मोलाचा ठरेल, तसेच तिलक वर्मा, टीम डेव्हिड आjणि ‘ज्युनिअर एबी डीव्हिलियर्स’ म्हणविला जाणारा, दक्षिण आफ्रिकेचा युवा आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेविसच्या खेळीवर सर्वांची नजर असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहकडे मुंबईचे नेतृत्व असेल. त्याच्या जोडीला जयदेव उनाडकट असेल, शिवाय मुंबईकडे मयांक मार्कंडेय आणि मुरुगन अश्विन यांच्या रूपाने फिरकीचे सक्षम पर्यायही आहेत.
दुसरीकडे दिल्लीकडून पृथ्वी शॉ सलामीला खेळू शकतो. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अद्याप संघासोबत जुळला नसल्याने, दिल्लीला त्याची कमतरता भासेल. शॉसह कर्णधार पंत, वेस्ट इंडिजचा आक्रमक रोवमन पॉवेल, सर्फराझ खान आणि १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता यश धूल यांच्याकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका निभावतील. फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि अक्षर यांच्या खांद्यावर आहे. वेगवान माऱ्यासाठी एन्रीच नॉर्खिया आणि मुस्तफिझूर रहमान सज्ज आहेत.
n कर्णधार म्हणून रोहितने आपली क्षमता आधीच दाखवून दिली आहे. दोन्ही संघांकडे आक्रमक आणि स्फोटक फलंदाजांची फळी असल्याने, रविवारी धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी ऋषभ पंतच्या नेतृत्वाकडेही सर्वांचे लक्ष असेल. त्याला भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही मानले जात असल्याने, त्याच्या निर्णय क्षमतेकडे लक्ष असेल.