जयपूर, आयपीएल २०१९ : महिला आयपीएलच्या अंतिम फेरीत व्हेलोसिटी संघाने सुपरनोव्हापुढे १२२ धावांचे आव्हान आव्हान ठेवले आहे.
सुपरनोव्हा संघाने नाणेफेक जिंकत व्हेलोसिटी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हा निर्णय योग्य असल्याचे सुपरनोव्हा संघाने दाखवून दिले. कारण सुपरनोव्हा संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि त्यांनी व्हेलोसिटीच्या पाच फलंदाजांना ३७ धावांमघ्ये माघारी धाडले. पण त्यानंतर सुष्मा वर्मा आणि अमेलिया केर यांनी सहाव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
सुष्माने यावेळी ३२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४० धावांची खेळी साकारली होती. सुष्माला केरने सुयोग्य साथ देत चार चौकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. या दोघांच्या धावांच्या जोरावर व्हेलोसिटी संघाला १२१ धावा करता आल्या.