जयपूर, महिला आयपीएल 2019 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या वादळी खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने महिला आयपीएल स्पर्धेत गुरुवारी व्हेलॉसिटी संघाविरुद्ध 3 बाद 142 धावा उभ्या केल्या. जेमिमाने नाबाद 77 धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात व्हेलॉसिटीला अपयश आले. सुपरनोव्हाजने हा सामना 12 धावांनी जिंकला. व्हेलॉसिटीने नेट रन रेटच्या जोरावर अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. त्यामुळे ट्रेलब्लेझर संघाला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.
नाणेफेक जिंकून मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघाने हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाज संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रिया पुनिया आणि चमारी अथापट्टू यांनी सावध सुरुवात केली, परंतु पाचव्या षटकात पुनिया ( 16) माघारी परतली. शिखा पांडेने तिला बाद केले. त्यानंतर आलेल्या जेमिमाने दुसऱ्या विकेटसाठी अथापट्टूसह अर्धशतकी भागीदारी केली. अॅमेला केरने ही भागीदारी तोडली. तिने अथापट्टूला ( 31) बाद केले. जेमिमाने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवली होती. तिने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही जेमिमाचा झंझावात थांबला नाही. तीने मैदानी फटक्यांवर भर देताना चौकारांची रांग लावली. जेमिमाने 48 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 77 धावा केल्या.