पुणे :
‘मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अडखळत झाली आहे. पण आता संघाला केवळ एक विजय मिळवण्याची गरज आहे. त्यानंतर आमचा संघ पूर्ण फॉर्ममध्ये येईल,’ असा विश्वास मुंबई इंडियन्स संघाचा क्रिकेट निर्देशक आणि माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केला आहे. सर्वाधिक पाच आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईने यंदाच्या सत्रात सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत.
झहीर म्हणाला की, ‘अद्याप स्पर्धेत ११ साखळी सामने होणे बाकी आहेत. त्यामुळे आम्हाला आता पुनरागमन करावे लागेल. तुम्हीही पाहिले असेल, यंदा काही संघ सलग सामने जिंकत आहेत किंवा हरत आहेत. त्यामुळे ही केवळ एका विजयाची गोष्ट आहे.’ झहीर पुढे म्हणाला की, ‘कधी कधी दबाच्या क्षणी तुम्ही स्वत:च्या क्षमतेवर शंका करता. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हाला संघाला प्रेरित करावे लागेल.’
आम्हाला सलग सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. पण प्रत्येक दिवस तुमचा असू शकत नाही. सामना ज्या क्षणी फिरतो, अशा निर्णायक क्षणी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. एक संघ म्हणून आम्ही असे करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे याकडे आम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल. - झहीर खान