रोहित नाईक मुंबई : पूर्वीच्या तुलनेत क्रिकेट खेळामध्ये आज कोणताही बदल झालेला दिसून येत नसून बदल दिसतोय तो सोयी-सुविधांमध्ये. परंतु, असे असले तरी युवा खेळाडूंनी मेहनत घेतली नाही, तर मग या सोयी-सुविधांचा काहीच उपयोग होणार नाही,’ असे स्पष्ट मत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
गेल्या वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मोठ्या थाटात सुरू केलेल्या तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या दुसऱ्या सत्रासाठी सुलक्षणा यांच्यासह मुंबईच्या माजी अष्टपैलू खेळाडू संगीता कामत यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली. यानिमित्ताने या दोन्ही प्रशिक्षकांनी ‘लोकमत’सह संवाद साधला. २ मेपासून वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे सुरू होणाऱ्या या शिबिरामध्ये मुलींच्या क्रिकेटकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती सुलक्षणा आणि संगीता यांनी या वेळी दिली.
याविषयी सुलक्षणा म्हणाल्या की, ‘आज महिला क्रिकेटला खूप महत्त्व आणि ग्लॅमरही मिळत आहे. गेल्या वर्षी अकादमीच्या पहिल्याच वर्षी मिळालेला मुलींचा मोठा प्रतिसाद पाहून सचिन सरांनी मुलींच्या क्रिकेटवर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला.’ भारतीय संघाकडून ४६ एकदिवसीय आणि ३१ टी२० सामने खेळलेल्या सुलक्षणा यांनी यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली असून या अनुभवाच्या जोरावर यष्टीरक्षकांची एक फळी तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुलक्षणा पुढे म्हणाल्या की, ‘या शिबिरामधून मी नक्कीच यष्टीरक्षणासाठी विशेष प्रयत्न करेन. मुलींमध्ये चांगले यष्टीरक्षक घडविण्याचा माझा कल असेल. यष्टीरक्षक संघाचा असा सदस्य असतो, ज्याच्यावर सर्वांची नजर असते. प्रत्येक ठिकाणी विशेषज्ञ फलंदाज किंवा गोलंदाज तयार करण्यावर भर देताना दिसून येतात. पण यष्टीरक्षकाच्या बाबतीत असे दिसून येत नाही. त्यामुळे मी यष्टीरक्षणासाठी विशेष लक्ष देईन.’
युवा खेळाडूंना चांगल्या संधी मिळाल्या की लगेच ते स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातात. स्वप्न बघणे चुकीचे नाही. पण उमेदीच्या काळात खेळाडूंनी केवळ आपल्या खेळावर लक्ष द्यावे. तुम्ही स्वप्न बघा, त्यात गैर काहीच नाही. पण त्यादृष्टीने मेहनत करा. तुमच्या मेहनतीवरच तुमचे स्वप्न अवलंबून आहे, हे विसरता कामा नये. - सुलक्षणा नाईक
सचिन सर गुणवान मुलींना पुढे आणण्याच्या प्रयत्नात आहेत जी खूप चांगली बाब आहे. यामुळे मुलींना खूप मोठ्या संधी मिळतील. नवोदितांच्या तंत्रावर भर देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आजच्या वेगवान क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू अष्टपैलू असणे आवश्यक ठरत आहे. २०१७च्या विश्वचषकानंतर महिला क्रिकेटचे संपूर्ण चित्र बदलले असून महिला खेळाडूंची देशात क्रेझ आहे. भारताच्या मुली ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांना कडवी झुंज देत आहेत. त्यामुळे भारतात गुणवत्तेची कोणतीही कमी नसून आता सचिन सर आणि विनोद सरांची साथ मिळाल्याने महिला क्रिकेटमध्ये नक्कीच आणखी प्रगती होईल. - संगीता कामत