मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आयपीएलचे सत्र संपल्यानंतर भारतीय खेळाडू आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. मधल्या फळीचे अपयश ही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरलेली आहे आणि त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्याय वापरून पाहिले. शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीनं सातत्याने कामगिरी करताना भारताला अनेकदा दमदार सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघाच्या वन डे क्रिकेटमधील यशात या जोडीचा महत्त्वाचा वाटा आहे. मैदानावरील या दोघांमध्ये असलेला ताळमेळ आणि समजुतदारपणा याला तोड नाही. त्यामुळे ही जगातील सर्वोत्तम सलामीची जोडी असल्याचा दावा भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.
आयपीएलमध्ये विविध संघाकडून खेळणारी ही जोडी वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघ 22 तारखेला लंडनसाठी रवाना होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्यात रोहित-धवन या जोडीकडून फार अपेक्षा आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहितशी बोलणं होतं का, असा प्रश्न धवनला विचारण्यात आला. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
तो म्हणाला,''सतत बोलून काय होईल? तो काय माझी पत्नी थोडी आहे! एखाद्या खेळाडूसोबत इतकी वर्षे खेळल्यानंतर त्याचा स्वभाव आपल्याला माहीत पडतो. त्यामुळे आणखी काय चर्चा करायची. समोर रोहित असो किंवा पृथ्वी शॉ माझ्या खेळण्याची शैली थोडी बदलणार आहे. एक फलंदाज फटकेबाजी करत असेल, तर दुसऱ्याने साहाय्यकाच्या भूमिकेत रहावे.''
या महत्त्वाच्या स्पर्धेला सामोरे जाताना मनावर दडपण आहे का, यावर धवन म्हणाला,''चिंता कसली? फलंदाजी करणं माझं काम आहे. काही वेळा तुम्ही धावा करता, काही वेळा अपयशी ठरता, परंतु त्याही परिस्थितीत संयम राखणे महत्त्वाचे आहे. चुकांतून धडा घेत त्यावर काम करायला हवे. त्यामुळे चिंता करण्याची गरज वाटत नाही.''
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धवनने 16 सामन्यांत 521 धावा केल्या आहेत.