Women Cricket World Cup 2024 : आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्या चार संघांमध्ये जागा मिळवेल असा विश्वास कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला. अलीकडेच पार पडलेल्या बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत टीम इंडियाने ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ३ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाला दोनवेळा मोठ्या व्यासपीठावर बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. मागील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसह राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कांगारूंनी भारतीय महिला संघाचा पराभव केला. यावेळी देखील हे दोन्हीही संघ एकाच गटात आहेत.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने आगामी विश्वचषकाबद्दल विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ती म्हणाली की, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ उपांत्य फेरी गाठतील असे मला वाटते. या चारही संघात स्टार खेळाडूंची फळी असल्याने मी यांना प्राधान्य दिले. मला वाटते की, ऑस्ट्रेलियाचा संघ तगडा आहे, त्यांनी नेहमीच आम्हाला कडवे आव्हान दिले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरूद्ध चांगली कामगिरी केल्यास संघाचा आत्मविश्वास वाढेल. हरमन 'आयसीसी'शी बोलत होती.
बांगलादेशात विश्वचषकाचा थरार
तसेच यजमान बांगलादेशच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांची चांगली साथ लाभेल. तेथील खेळपट्टीचा त्यांना अनुभव असल्याने ही त्यांची जमेची बाजू असेल. त्यांच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी आम्ही आतुर आहोत. मला आशा आहे की, एक संघ म्हणून आम्ही त्यांच्याविरूद्ध देखील चांगली कामगिरी करू, असेही भारतीय कर्णधार हरमनने सांगितले.
महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर ११३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया