भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दोन्ही देशांतील क्रिकेट प्रेमींसाठी नेहमीच पर्वणीचा असतो. उभय संघांमधील तणावपूर्ण संबंध लक्षात घेता, त्यांच्या द्विदेशीय मालिका होणे कठीणच आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये हे संघ एकमेकांना भिडत आहेत. रविवारीही दोन संघांमध्ये Women Emerging Asia cupमधील सामना रंगला आणि त्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचा डाव 106 धावांत गुंडाळला. कर्णधार देविका वैद्य हीने 23 धावांत 4 विकेट्स घेत पाक फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले.
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, सहाव्याच षटकात त्यांना पहिला धक्का बसला. जवेरिया रॉफ ( 7) हिला सिमरन बहादूरने बाद केले. त्यानंतर देविकानं पाकच्या मुनीबा अली सिद्दीकीचा ( 7) अडथळा दूर केला. देविकानं पुढच्याच षटकात कायनात हफिजला भोपळाही फोडू न देता माघारी पाठवले. पाकिस्तानचा निम्मा संघ 53 धावांत माघारी परतला होता. तुबा हसन ( 32) आणि रमीन शमीम ( 31) यांनी पाकिस्तान संघाच्या डावाला सावरले. पण, अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ न मिळाल्यानं पाकचा संपूर्ण संघ 46.5 षटकांत 106 धावांत माघारी परतला.
भारताची कर्णधार देविकानं 23 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तिला सुश्री दिव्यादर्शनी हीने 16 धावांत 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. मनाली दक्षिणी, सिमरन बहादूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.