नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये महिला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना माहिती पाठवली आहे. या लिलावासाठी खेळाडूंना 26 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. खेळाडूंना पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये महिला आयपीएलऐवजी महिला ट्वेंटी-20 लीग असे लिहिण्यात आले आहे. अशा स्थितीत ही लीग याच नावाने ओळखली जाईल, असे मानले जात आहे. अलीकडेच बीसीसीआयने या स्पर्धेतील संघांच्या मालकी हक्कांसाठी निविदा काढल्या होत्या. यासोबतच मीडियाच्या हक्कांसाठीही निविदा काढण्यात आल्या आहेत.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने कॅप्ड अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आणि अनकॅप्ड खेळाडूंना लिलावासाठी नोंदणी करण्यास सांगितले आहे. कॅप्ड खेळाडूंसाठी 50 लाख, 40 लाख आणि 30 लाख अशी तीन श्रेणीत बेस प्राइस ठरवण्यात आली आहे. अनकॅप्ड खेळाडूंसाठी दोन श्रेणी ठेवण्यात आल्या होत्या. या अंतर्गत खेळाडूंची बेस प्राइस 20 लाख आणि 10 लाख असेल.
संघ मालकांकडे जाणार लिलावची यादी लिलाव रजिस्टरमध्ये सर्व खेळाडूंची नावे आल्यानंतर लिलाव यादी तयार करून संघ मालकांना पाठवली जाईल. अद्याप मालकी हक्काचा निर्णय झालेला नसल्याने संघ मालक अद्याप प्रतीक्षेत आहेत. त्यानंतरच संघांची नावे निश्चित होतील. जे खेळाडू लिलावासाठी निवडले जाणार नाहीत त्यांना रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संधी मिळू शकते. आयपीएलच्या धर्तीवर लिलावाची नोंदणी करण्यात आली आहे.
मीडिया अधिकारांची घोषणा लवकरचदरम्यान, महिला ट्वेंटी-20 लीगच्या मीडिया हक्कांचा लिलाव देखील होणार आहे. यापूर्वी 12 जानेवारी रोजी होणार होते मात्र ते चार दिवसांनी लांबले आहे. आता 16 जानेवारीला होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर या स्पर्धेत 22 सामने घेण्याची योजना असून मार्चच्या अखेरीस फायनल सामना होऊ शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"