Join us  

IPLपेक्षा महिला लीगला अधिक प्रतिसाद: हरमनप्रीत कौर; भविष्यात आणखी संघ वाढण्याची आशा

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने जेतेपद उंचावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 6:26 AM

Open in App

लंडन : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) भारतीय महिला क्रिकेटला कलाटणी देणारी ठरल्याचे म्हटले. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने जेतेपद उंचावले. सध्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत व्यग्र असलेल्या हरमनने एका कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘आयपीएलपेक्षा डब्ल्यूपीएलला प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद लाभला,’ असे हरमनने नमूद केले.

हरमनप्रीत म्हणाली की, ‘डब्ल्यूपीएल ही स्पर्धा आमच्यासाठी गेम चेंजर होती. पहिला हंगाम खूप चांगला गेला. घरी परतल्यानंतर सगळ्यांना ते आवडलं. आम्हाला मिळालेला प्रतिसाद अविस्मरणीय होता. खरं सांगायचं झालं, तर काही प्रेक्षकांना आयपीएलच्या तुलनेत डब्ल्यूपीएलमध्ये अधिक रस होता. कारण सर्वांना पाहण्यासाठी काहीतरी नवीन होते,’ असे हरमनप्रीतने डॅगर्स अँड लिड्स पॉडकास्टवर सांगितले. डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम ४ मार्च ते २६ मार्च या दरम्यान मुंबईत पार पडला. या लीगच्या पदार्पणाच्या हंगामात एकूण पाच संघ सहभागी होते आणि २२ सामने खेळविले गेले. सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील येथे झाले होते.

हरमनप्रीत पुढे म्हणाली की, ‘डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामाने प्रेक्षकांना भुरळ घातली असून, मला आशा आहे की, भविष्यात आमच्यासोबत आणखी संघ असतील. आपल्या देशात खूप चांगली गुणवत्ता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे,’ असेही हरमनप्रीतने सांगितले.  मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. भारताबाहेर फ्रँचाइजी स्पर्धा खेळण्याच्या अनुभवाबद्दल हरमनप्रीत म्हणाली की, ‘पहिल्यांदा महिला बिग बॅश लीगमध्ये खेळले, तेव्हा वेगळा अनुभव आला. इंग्लिश खेळाडूंसोबत नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.’

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगहरनमप्रीत कौर
Open in App