WPL 2024, MI vs RCB Live । दिल्ली: महिला प्रीमिअर लीगमध्येमुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकतर्फी लढत पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून स्मृती मानधनानेमुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत एलिसे पेरीने धारदार गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजीची कंबर मोडली. तिने ४ षटकांत अवघ्या १५ धावा देत ६ बळी घेत ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे WPL च्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबईचा संघ सर्वबाद झाला. मुंबईला १९ षटकांत सर्वबाद केवळ ११३ धावा करता आल्या.
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीसाठी आजचा सामना हा 'करा किंवा मरा' असा आहे. मुंबईने या आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, पण आरसीबीला नमवून गुणतालिकेत पहिले स्थान गाठण्याचे मोठे आव्हान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबईसमोर आहे. कारण गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकावरील संघ थेट अंतिम फेरीत खेळणार आहे.
मुंबईच्या वाटेत एलिसे पेरीने मोठा अडथळा आणला. तिने सजीवन सजना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा त्रिफळा उडवला, तर नताली सिव्हर, अमेलिया केर, अमनजोत कौर आणि पूजा वस्त्राकर यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला. महिला प्रीमिअर लीगच्या इतिहासात एकाच सामन्यात सहा बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
WPL च्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट स्पेल
- एलिसे पेरी - १५ धावांत ६ बळी विरूद्ध मुंबई इंडियन्स
- मरिझेन कॅप - १५ धावांत ५ बळी विरूद्ध गुजरात जायंट्स
- आशा सोभना - २२ धावांत ५ बळी विरूद्ध यूपी वॉरियर्स
- तारा नॉरिस - २९ धावांत ५ बळी विरूद्ध आरसीबी
- किम गर्थ - ३६ धावांत ५ बळी विरूद्ध यूपी वॉरियर्स
मुंबईचा संघ गारद
मुंबईकडून हिली मॅथ्यूज (२६) आणि सजीवन सजना (३०) वगळता मुंबईची एकही फलंदाज २० हून अधिक धावा करू शकली नाही. तर, नताली सिव्हर (१०), हरमनप्रीत कौर (०), अमेलिया केर (२), अमनजोर कौर (४), पूजा वस्त्राकर (६), हुमैरा काझी (४), प्रियंका बाला (१९), शबनीम इ्स्माइल (८) आणि सायका इशाकने (१) धाव केली.
दरम्यान, WPL मध्ये केवळ तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवणारा संघ थेट अंतिम सामना खेळतो. दिल्ली आणि मुंबईने प्लेऑफचे तिकिट मिळवले आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. जर आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांना थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. मात्र, जर बंगळुरूने हा सामना गमावला तर प्रकरण नेट रन रेटवर येईल. सध्या आरसीबीचा नेट रन रेट चांगला आहे. पण गुजरात जायंट्सचा अजून एक सामना बाकी आहे. दुसरीकडे RCB वाईट रीतीने हरली आणि गुजरातनेही आपला सामना गमावला (गुजरातचा नेट रन रेट खूपच खराब आहे). अशा स्थितीत यूपी वॉरियर्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.