नवी दिल्ली: स्टार खेळाडू स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या २३ मेपासून पुण्यात रंगणाऱ्या महिला टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत विविध संघांचे नेतृत्व करतील. बीसीसीआयने प्रत्येक संघात १६ खेळाडू निवडले.
हरमनकडे सुपरनोवाज, स्मृतीकडे ट्रेलब्लेझर्स, तर दीप्तीकडे व्हेलोसिटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. मागची स्पर्धा २०२० मध्ये झाली. त्यात ट्रेलब्लेझर्सने बाजी मारली होती. अनुभवी मिताली राज, झूलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांना मात्र कोणत्याही संघात स्थान देण्यात आलेले नाही.
स्पर्धेत १२ विदेशी खेळाडू असतील. त्यात दक्षिण आफ्रिकेची सलामीची फलंदाज लॉरा वोलवॉर्ट आणि जगातील नंबर वन गोलंदाज सोफी एक्लेस्टोनचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची एकमेव खेळाडू लेग स्पिनर एलिना किंगदेखील खेळणार आहे. बीसीसीआय पुढील सत्रापासून महिलांसाठी पूर्ण आयपीएलचे आयोजन करण्याची योजना आखत आहे.