ICC Women’s T20 World Cup 2024 : भारताच्या महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाच्या संघाने मोठ्या व्यासपीठावर नेहमीच आव्हान दिले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेला कसोटी सामना वगळता ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच वरचढ ठरला आहे. राष्ट्रकुल स्पर्धा असो की मग विश्वचषक... अनेकदा भारतीयांच्या हृदयावर घाव घालण्याचे काम कांगारुंनी केले. तीन ऑक्टोबरपासून यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाकडे स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू जेस जोनास्सेनने टीम इंडियाचे कौतुक करताना एक इशाराही दिला. भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असला तरी आम्हाला कमी लेखून चालणार नसल्याचे तिने आवर्जुन सांगितले.
भारताने अद्याप एकदाही विश्वचषकाची ट्रॉफी जिंकलेली नाही. भारतीय संघ मजबूत आहे, त्यामुळे त्यांच्याकडे ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. यूएईतील खेळपट्टीचा त्यांना चांगलाच अभ्यास असून याचा नक्कीच फायदा होईल. आम्ही तिकडे कधीच खेळलो नाही. पण, मोठ्या स्पर्धांमध्ये कशी कामगिरी करायची हे ऑस्ट्रेलियन संघाला चांगलेच ठाऊक आहे. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये खेळण्याचा ऑस्ट्रेलियाला अनुभव आहे. मात्र, यूएईतील खेळपट्ट्या नक्कीच आव्हानात्मक असतील असे दिसते. आगामी स्पर्धा फारच रंगतदार होईल यात शंका नाही, असेही जोनास्सेनने सांगितले.
विश्वचषकासाठी भारताचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.
भारताचे वेळापत्रक - ४ ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ६ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, दुबई, दुपारी ३.३० वाजल्यापासून९ ऑक्टोबर - विरुद्ध श्रीलंका, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१३ ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१७ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना१८ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना२० ऑक्टोबर - अंतिम सामना