Women T20 World Cup 2024 : बांगलादेशातील हिंसेची आग दिवसेंदिवस भडकत चालली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला. आता लष्कराने बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचे काय होणार असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्तेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) देखील या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. कारण ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसी महिला विश्वचषक स्थलांतरित करू शकते. आयसीसीने विश्वचषक आयोजनासाठी भारत, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांना बॅकअप म्हणून ठेवले आहे. मात्र, कमी कालावधीतील तयारी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. म्हणून हा विश्वचषक भारतात होण्याची दाट शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या पुरुषांच्या अ क्रिकेट संघाला ४८ तासांसाठी पाकिस्तान दौऱ्यावर बंदी घातली आहे. त्यांचे बोर्ड पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात आहे.
दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार बांगलादेशच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. या विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर ११३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया