Smriti Mandhana, Women's T20 World Cup IND vs PAK: महिलांचा T20 क्रिकेट विश्वचषक उद्यापासून म्हणजे ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. भारतीय महिला संघ या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी यूएईला पोहोचला. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. तर त्यानंतर भारतीय महिला संघाचा सामना ६ ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधाना हिने बुधवारी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत भावना व्यक्त केल्या.
"चाहत्यांच्या भावनांमुळे हा एक महत्त्वाचा सामना बनतो. माझ्या मते भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्व इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा चाहत्यांच्या भावनांवर अधिक अवलंबून असते. खेळाडू एकमेकांशी बोलत नाहीत, असे होत नाही. या दोन्ही देशांच्या भावनांमुळे हा सामना महत्त्वाचा ठरतो. माझ्यासाठी विश्वचषकातील प्रत्येक सामना खास असतो आणि आम्ही प्रत्येक सामन्यात समान प्रयत्न करतो. पण भारत-पाकिस्तान सामन्यांशी नक्कीच खूप भावना जोडलेल्या आहेत," असे स्मृती मंधाना स्टारस्पोर्ट्सशी बोलताना म्हणाली.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाबद्दल विचारले असता ती म्हणाली, "विश्वचषकात प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. तुम्हाला प्रत्येक सामन्यात १०० टक्के प्रयत्न करणे आवश्यक असते. न्यूझीलंड आणि श्रीलंका हे बलाढ्य संघ आहेत पण ऑस्ट्रेलिया विश्वविजेता आहे. त्यांच्याविरोधात तुम्हाला थोडीशी चूक करण्याचीही संधी नसते. त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करायची असेल तर त्या दिवशी तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. ऑस्ट्रेलियाचा सामना करणे नेहमीच रोमांचक असते. कारण तो खूप चांगला संघ आहेत आणि त्यांना पराभूत करणे हे मोठे आव्हान आहे," अशी प्रामाणिक कबुली स्मृती मंधानाने दिली.