PAKW vs NZW : पाकिस्तानच्या महिला संघाच्या पराभवासह भारतीय महिला संघाचे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील आव्हान संपुष्टात आले. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात न्यूझीलंडने ५४ धावांनी बाजी मारताना पाकिस्तानचा धुव्वा उडवत दिमाखात महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासह भारताचे आव्हानही संपुष्टात आले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला २० षटकांत ६ बाद ११० धावांवर रोखत पाकिस्तानने आपल्या विजयासह भारताच्या आशाही उंचावल्या होत्या. पण, शेजाऱ्यांना सोप्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही आणि पाकिस्तान ५६ धावांत गारद झाला. दरम्यान, पाकिस्तानी संघाने त्यांच्या पुरुष संघाप्रमाणे गचाळ क्षेत्ररक्षण करताना आठ सोपे झेल सोडले. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानचा विजय आवश्यक होता. मात्र, यानंतर न्यूझीलंडने शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव ११.४ षटकांत केवळ ५६ धावांवर गुंडाळला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाककडून केवळ कर्णधार फातिमा सना (२१) आणि सलामीवीर मुनीबा अली (१५) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. इतर सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले. पाकचा अर्धा संघ २८ धावांवर गारद करत न्यूझीलंडने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. इडेन कार्सन (२/७) व अमेलिया केर (३/१४) यांनी पाकचे कंबरडे मोडले. त्याआधी, सलामीवीर सूझी बेट्स (२८) आणि ब्रूक हॅलिडे (२२) यांच्या जोरावर न्यूझीलंडने समाधानकारक मजल मारली. नाशरा संधूने (३/१८) नियंत्रित मारा करताना न्यूझीलंडला मर्यादित धावसंख्येत रोखण्यात मोलाचे योगदान दिले.
न्यूझीलंडच्या इडेन कार्सन हिने टिच्चून मारा करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. ७ धावांमध्ये २ बळी घेणारी कार्सन सामनावीर ठरली. अ गटातून न्यूझीलंडच्या आधी ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विशेष बाब म्हणजे २०१६ नंतर प्रथमच भारताला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही.