माउंट मोनगानुई : यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्याने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेला शुक्रवारपासून दिमाखदार सुरुवात झाली. दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० वाजता मैदानात उतरले. यंदाच्या विश्वचषकात सर्व सामन्यांत डीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीने दिली.
भारतीय महिलांचा सलामीचा सामना ६ मार्चला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे महिला विश्वचषक स्पर्धेत डीआरएसचा वापर करण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी २०१७ साली इंग्लंडच्या यजमानपदाखाली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत डीआरएसचा वापर झाला होता. त्या स्पर्धेत भारतीय महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. स्पर्धेचे सामने सहा स्थळांवर आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक सामन्यादरम्यान किमान २४ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही आयसीसीने दिली.