सिल्हेट : सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने 4 सामन्यांमधील 3 सामने जिंकून क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. खरं तर पाकिस्तानच्या संघाने देखील 4 पैकी तीन सामने जिंकले आहेत मात्र भारताचा नेट रनरेट जास्त असल्यामुळे भारतीय संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या क्रमवारीत भारत पहिल्या तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर स्थित आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे बांगलादेश आणि श्रीलंकेचा संघ आहे.
दरम्यान, भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून संघाने आतापर्यंत सहावेळा या स्पर्धेचा किताब पटकावला आहे. भारताने स्पर्धेतील आपले सलामीचे तिन्ही सामने जिंकून एकतर्फी वर्चस्व राखले होते, मात्र पाकिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे संघाचा विजयी चौकार हुकला आहे. भारताला या स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला तर थायलंडच्या संघाने गुरूवारी पाकिस्तानच्या संघाचा पराभव करून इतिहास रचला. तर मलेशियाच्या संघाला अद्याप विजयाच्या खाते उघडता आले नाही.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेटरनरेट |
भारत | 4 | 3 | 1 | 6 | +2.480 |
पाकिस्तान | 4 | 3 | 1 | 6 | +1.684 |
बांगलादेश | 3 | 2 | 1 | 4 | +1.829 |
श्रीलंका | 3 | 2 | 1 | 4 | +0.373 |
यूएई | 4 | 2 | 2 | 4 | -1.648 |
थाईलंड | 4 | 1 | 2 | 2 | -1.079 |
मलेशिया | 4 | 0 | 4 | 0 | -3.02 |
पाकिस्तानने भारताचा विजयरथ रोखला
आशिया चषकात शुक्रवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 137 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना भारतीय महिलांना अपयश आले. पाकिस्तानच्या आक्रमक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज चितपट झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानी गोलंदाजांनी सांघिक खेळी करून भारतीय संघाचा विजयरथ रोखला आणि 13 धावांनी मोठा विजय मिळवला. खरं तर आशिया चषक 2022 मध्ये हा भारतीय संघाचा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघाने सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक लगावली होती.
7 संघांमध्ये रंगतोय 'सामना'
1 ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील 2 आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. त्यामुळे किताबासाठी सात संघ आमनेसामने असणार आहेत.
Web Title: Women's Asia Cup 2022 Points Table Despite defeat against Pakistan, Indian team remains at the top position in the points table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.