Mithali Raj Latest News : श्रीलंकेच्या महिला संघाने टीम इंडियाचा पराभव करून प्रथमच आशिया चषक जिंकला. महिलांच्या आशिया चषकात नेहमीच भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने सर्वाधिक सातवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र, रविवारी श्रीलंकेच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताच्या वर्चस्वाला धक्का देत किताब जिंकला. श्रीलंकेच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा पराभव करून अखेर आशिया चषक जिंकला. याआधी पाचवेळा अंतिम सामना खेळणाऱ्या श्रीलंकेला एकदाही किताब जिंकता आला नव्हता. यंदा मात्र यजमान संघाने बाजी मारत भारताला पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने सहज विजय मिळवला. भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात केलेल्या चुकांमुळे यजमानांचा विजय अधिक सोपा झाला. श्रीलंकेने ८ विकेट आणि ८ चेंडू राखून प्रथमच आशिया चषक उंचावला.
स्मृती मानधना वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे टीम इंडिया केवळ १६५ धावा करू शकली. याचाच दाखला देत भारताची माजी कर्णधार मिताली राजने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे. मिताली राजने सांगितले की, येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ ट्वेंटी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाने तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर अधिक काम करणे गरजेचे आहे. ही त्यांची कमकुवत बाजू आहे. भारत अद्याप तिसऱ्या क्रमाकांसाठी योग्य फलंदाजाच्या शोधात आहे. उमा छेत्री आणि हेमलथा यांचा प्रयोग करून झाला पण तितकेसे यश आले नाही. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना ही जोडी बाद झाल्यानंतर डाव सांभाळण्यासाठी कोणीतरी असायला हवे. मिताली 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलत होती.
तसेच भारताने पाचऐवजी सहा गोलंदाज खेळवायला हवेत. यात अष्टपैलूंचा समावेश असेल. आगामी काळात भारतीय संघाने अधिक चांगले क्रिकेट खेळायला हवे. त्यांना चांगली संधी आहे कारण विश्वचषकाची स्पर्धा बांगलादेशात होत आहे. तेथील खेळपट्टी आणि तेथील वातावरण भारतीय फलंदाजांना मदत करू शकते. टीम इंडियाची ताकद ही नेहमीच फिरकी गोलंदाजी राहिली आहे. त्यामुळे त्यांनी चांगले क्रिकेट खेळून स्पर्धा जिंकावी, असे मिताली राजने अधिक सांगितले.