women's asia cup 2024 schedule : महिलांच्या आशिया चषकाला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याने आपल्या अभियानाची सुरुवात करेल. टीम इंडिया स्पर्धेचा प्रबळ दावेदार असली तरी प्रतिस्पर्धी संघांना हलक्यात घेऊन चालणार नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनी मागील काही कालावधीपासून आपल्या खेळीत सुधारणा केल्याचे दिसते. भारत, नेपाळ, यूएई, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, थायलंड आणि पाकिस्तान हे संघ एका किताबासाठी भिडतील. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये यंदाचा आशिया चषक होत आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सायंकाळी सात वाजल्यापासून सुरुवात होईल. भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे. बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने पाच अंतिम सामने खेळूनही त्यांना अद्याप किताब जिंकता आला नाही. आशिया चषकाच्या स्पर्धेनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे विश्वचषकाची तयारीच आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर महिला आशिया चषकाचे सामने लाईव्ह पाहता येतील. याशिवाय डिस्नी प्लस हॉटस्टार ॲप आणि वेबसाईटवर आशिया चषकाचा थरार अनुभवता येईल.
स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला प्रश्न विचारताना एक हास्यास्पद घटना घडली. खरे तर भारत विरूद्ध बांगलादेश या मालिकेचे कव्हरेज चांगल्या प्रकारे झाले नाही. याबद्दल पत्रकाराने प्रश्न केला असता हरमनने तिच्या शैलीत उत्तर दिले. "महिला क्रिकेटचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पण, टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेली होती तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना तितकेसे प्राधान्य मिळाले नाही. यावर तुझे काय मत आहे?", पत्रकाराच्या या प्रश्नावर हरमनप्रीतने स्मित हास्य करत म्हटले की, होय, पण त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. तुम्हाला इथे येऊन कव्हर करायला हवे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलथा, आशा शोभना , राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.
राखीव खेळाडू - श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कान्वेर, मेघना सिंग.
भारत या स्पर्धेसाठी अ गटात आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होईल. १९ जुलै रोजी अर्थात आज भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होत आहे, तर भारताचा दुसरा सामना २१ जुलैला यूएईसोबत होईल. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडिया २३ जुलै रोजी नेपाळशी भिडेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवले जातील.
आशिया चषकातील भारताचे सामने -१९ जुलै - भारत विरूद्ध पाकिस्तान२१ जुलै - भारत विरूद्ध यूएई२३ जुलै - भारत विरूद्ध नेपाळ