INDW vs BANW Semi Final । दाम्बुला : महिला आशिया चषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा दारूण पराभव केला. यासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. बांगलादेशने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी स्फोटक खेळी केली. स्मृती मानधना (नाबाद ५५ धावा) आणि शेफाली वर्मा (नाबाद २६ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने १० विकेट आणि ५४ राखून सामना जिंकला. त्यामुळे यंदाचाही आशिया चषक जिंकून भारतीय संघ आठव्यांदा किताब जिंकण्याची किमया साधतो का हे पाहण्याजोगे असेल. रणगीरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. (women asia cup semi final 2024)
तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत बांगलादेशला अवघ्या ८० धावांत रोखले. रेणुका सिंग आणि राधिका यादव यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. बांगलादेशकडून कर्णधार निगर सुल्ताना (५१ चेंडूत ३२ धावा) वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. भारताकडून रेणुका सिंगने गोलंदाजीत कमाल केली. तिने ४ षटकांत अवघ्या १० धावा देत महत्त्वाचे तीन बळी घेतले. अखेर बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद केवळ ८० धावा करू शकला. या सोप्या आव्हानाचा सहज पाठलाग करून भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजयी संघ भारतासोबत किताबासाठी मैदानात असेल. २८ तारखेला रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.
श्रीलंकेच्या धरतीवर महिलांच्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. एकूण आठ संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात होते. पण, आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे. बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने पाच अंतिम सामने खेळूनही त्यांना अद्याप किताब जिंकता आला नाही. आशिया चषकाच्या स्पर्धेनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे विश्वचषकाची तयारीच आहे.
Web Title: Women's Asia Cup 2024 Semi Final INDW vs BANW Team India defeated Bangladesh to enter the final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.