women's asia cup 2024 schedule : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. शुक्रवारपासून (१९ जुलै) महिलांच्या आशिया चषकाला सुरुवात होत आहे. श्रीलंकेच्या धरतीवर होत असलेल्या या स्पर्धेचे सर्व सामने चाहत्यांना स्टेडिययमध्ये जाऊन मोफत पाहता येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी सामना खेळवला जाईल. टीम इंडिया स्पर्धेचा प्रबळ दावेदार असली तरी प्रतिस्पर्धी संघांना हलक्यात घेऊन चालणार नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनी मागील काही कालावधीपासून आपल्या खेळीत सुधारणा केल्याचे दिसते. भारत, नेपाळ, यूएई, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, थायलंड आणि पाकिस्तान हे संघ एका किताबासाठी भिडतील. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये यंदाचा आशिया चषक होत आहे. २८ जुलै रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.
आशिया चषकाच्या स्पर्धेनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे विश्वचषकाची तयारीच आहे. आशिया चषकाच्या नवव्या पर्वाचा प्रबळ दावेदार म्हणून भारताकडे पाहिले जाते. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर महिला आशिया चषकाचे सामने लाईव्ह पाहता येतील. याशिवाय डिस्नी प्लस हॉटस्टार ॲप आणि वेबसाईटवर आशिया चषकाचा थरार अनुभवता येईल. शुक्रवारी यूएई आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सायंकाळी सात वाजल्यापासून सुरुवात होईल. भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे. बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने पाच अंतिम सामने खेळूनही त्यांना अद्याप किताब जिंकता आला नाही.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलथा, आशा शोभना , राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.
राखीव खेळाडू - श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कान्वेर, मेघना सिंग.
भारत या स्पर्धेसाठी अ गटात आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होईल. १९ जुलै रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होईल, तर भारताचा दुसरा सामना २१ जुलैला यूएईसोबत होईल. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडिया २३ जुलै रोजी नेपाळशी भिडेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवले जातील.
आशिया चषकातील भारताचे सामने -
१९ जुलै - भारत विरूद्ध पाकिस्तान
२१ जुलै - भारत विरूद्ध यूएई
२३ जुलै - भारत विरूद्ध नेपाळ
Web Title: women's asia cup 2024 Will India maintain its dominance 8 teams ready for Asia Cup Find out where to watch live matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.