सिल्हेट : सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने असणार आहे. स्पर्धेतील पहिल्या उपांत्यफेरीत भारतीय संघाने थायलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. गुरूवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव करून विजय मिळवला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 122 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने सावध खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे भारताविरूद्ध फायनल खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ अंतिम फेरी गाठेल असे वाटत असताना श्रीलंकेच्या महिलांनी शानदार खेळी करत निसटता विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. खरं तर सुरूवातीपासूनच पाकिस्तानच्या संघाची सामन्यात मजबूत पकड राहिली होती. मात्र पाकिस्तानच्या डावाच्या अखेरच्या 3 षटकांमध्ये सामना फिरला.
चेंडूप्रमाणे धावांची गरज असताना अखेरच्या 3 षटकांत पाकिस्तानचे 3 खेळाडू तंबूत परतले. त्यामुळे श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिने 42 धावांची शानदार खेळी केली मात्र तिला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेरच्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. श्रीलंकेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांना घाम फुटला. अखेरच्या चेंडूत 3 धावांची आवश्यकता होती मात्र पाकिस्तानला केवळ 1 धाव काढता आली आणि आशिया चषकाच्या फायनलला मुकावे लागले.
शनिवारी होणार फायनल 15 ऑक्टोबर रोजी महिला आशिया चषकाच्या फायनलचा थरार रंगणार आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सातव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावणार का हे पाहण्योजोगे असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल. भारतीय महिलांनी आशिया चषकात केवळ एका पराभवाचा सामना करून अंतिम फेरी गाठली आहे.