नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश टी२० स्पर्धेत आक्रमक अर्धशतक झळकावताना आपल्या सिडनी थंडर्स संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. रविवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीतने सिडनी संघाकडून खेळताना तुफानी अर्धशतक ठोकत ब्रिस्बेन हीटला २८ धावांनी नमविले.
हरमप्रीतने केवळ २३ चेंडूत अर्धशतक ठोकताना सिडनीला २० षटकांत ४ बाद १९२ धावांचा डोंगर उभारून दिला. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रिस्बेन संघाचा डाव १८.५ षटकांत १६४ धावांत संपुष्टात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या सिडनीचा निर्णय हरमनप्रीतने सार्थ ठरविला. रचेल प्रिस्ट (४९) आणि रचेल हॅन्स (३६) या सलामीवीरांनी सिडनीला ८९ धावांची वेगवान सलामी दिली. यानंतर हरमनप्रीतने आपला जलवा दाखवताना २६ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची तुफानी खेळी केली. २१५.३८ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने फटकेबाजी केलेल्या हरमनप्रीतमुळे सिडनी संघाच्या धावगतीला कमालीचा वेग मिळाला. कर्णधार अॅलेक्स ब्लॅकवेल (३३*) हिनेही वेगवान खेळी केली.
यानंतर धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ब्रिस्बेनकडून सलामीवीर ग्रेस हॅरिसचा अपवाद वगळता इतर कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. ग्रेसने २८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. मात्र तिला दुसºया टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. मधल्या फळीतील डेलिस किमिन्सने २३ चेंडूंत ३८ धावा केल्या, मात्र ती धावबाद होताच ब्रिस्बेनच्या आशा संपुष्टात आल्या. स्टेफनी टेलर आणि मैसी गिब्सन यांनी प्रत्येकी ३ बळी घेत सिडनीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या वेळी तुफानी अर्धशतक झळकावलेल्या हरमनप्रीतने क्षेत्ररक्षणातही लक्ष वेधताना एक शानदार झेल घेतला. (वृत्तसंस्था)
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानेही आपल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर होबार्ट हरिकेन्स संघाला विजयी केले. होबार्टकडून सर्वाधिक धावांची खेळी केलेल्या स्मृतीने ४१ चेंडूत १३ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. याजोरावर होबार्टने मेलबर्न स्टार्स संघाविरुद्ध २० षटकात ६ बाद १९६ धावांचा एव्हरेस्ट उभारला. यानंतर मेलबर्न संघाचा १६.५ षटकात केवळ १२४ धावांमध्ये खुर्दा पाडत होबार्टने ७२ धावांनी मोठा विजय मिळवला.
Web Title: Women's Big Bash League: Harmanpreet scored his half century in 23 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.